नेमकं काय घडलं?
ही घटना रात्री साडेआठच्या सुमारास घडली. वन ट्री हिल पॉइंटजवळ असलेला कदम टी स्टॉल हा नेहमीच पर्यटक आणि स्थानिकांच्या वर्दळीचा भाग असतो. दुकान बंद केल्यानंतर स्टॉलचे मालक नारायण मारुती कदम आणि त्यांची पत्नी चंदा हे घरात बसले होते. याच वेळी चार अज्ञात चोरटे दुकानात आले.
advertisement
सिगारेट खरेदीच्या बहाण्याने दुकानात प्रवेश करताच चोरट्यांनी अचानक चाकू आणि सुऱ्याचा धाक दाखवला. त्यांनी नारायण कदम आणि त्यांच्या पत्नीला दोराने बांधून ठेवले. त्यानंतर चोरट्यांनी घराची झडती घेतली. झडतीदरम्यान चोरट्यांनी घरातील सुमारे एक लाख रुपयांची रोख रक्कम तसेच सात ते आठ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. चोरी केल्यानंतर चोरटे तात्काळ घटनास्थळावरून फरार झाले.
दाम्पत्याला मोठा मानसिक धक्का
कदम टी स्टॉल आणि त्यांचे घर एकाच ठिकाणी असल्याने ही घटना घडली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे कदम दाम्पत्याला मोठा मानसिक धक्का बसला आहे. रात्रीच्या वेळी अशा प्रकारची घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्येही असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
माथेरानमधील अनेक पॉइंट, बंगले आणि दुकाने गावापासून दूर आणि काहीशी एकाकी ठिकाणी आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी चोरी, दरोडे यांसारख्या घटना वाढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी सुरक्षा व्यवस्था अपुरी असल्याचे चित्र दिसून येत आहे.
बाहेरील लोकांच्या ये-जा वर नियंत्रणाची मागणी
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, कामानिमित्त दररोज 300 ते 400 लोक बाहेरून माथेरानमध्ये ये-जा करतात. मात्र या लोकांची कोणतीही नोंद ठेवली जात नाही किंवा तपासणी केली जात नाही. यामुळे गुन्हेगारांना शहरात सहज प्रवेश मिळत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
गावात एखाद्याचे पाहुणे आले तरी प्रवेशद्वारावर चौकशी होते. मात्र पर्यटक सोडून दररोज येणाऱ्या कामगार, गडी-मजुरांवर कोणतेही नियंत्रण नसल्याने सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत आहे. त्यामुळे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी बाहेरून येणाऱ्या कामगारांची ओळखपत्र तपासणी करावी, त्यांची नोंद ठेवावी तसेच दस्तुरी नाक्यावर कडक तपासणी आणि प्रवेश नियंत्रण ठेवावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
या घटनेनंतर व्यापारी आणि स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलिस व प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.






