बेस्ट पतपेढीची ही निवडणूक म्हणजे केवळ कर्मचारी पतपेढीची लढत नाही, तर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि भाजप-शिंदे गटाच्या ताकदीची रंगीत तालीम मानली जात आहे.
बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या 2025-30 या पंचवार्षिक संचालक मंडळाची निवडणूक आज सोमवारी, 18 ऑगस्ट रोजी पार पडणार असून, मंगळवारी, 19 ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे. गेली चार वर्षे रखडलेली ही निवडणूक आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर होत असल्याने राजकीयदृष्ट्या ती विशेष महत्त्वाची ठरणार आहे.
advertisement
या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या कामगार संघटना सक्रिय झाले असून, त्यांनी बेस्ट कामगार सेना (उद्धव ठाकरे गट) आणि मनसे बेस्ट कामगार सेना (राज ठाकरे गट) यांच्या माध्यमातून ‘उत्कर्ष पॅनल’ उभं केलं आहे. या पॅनलविरोधात भाजपसह पाच संघटनांनी एकत्र येत ‘सहकार समृद्धी पॅनल’ मैदानात उतरवलं आहे.
बेस्टच्या 21 जागांसाठीच्या या निवडणुकीत उद्धवसेना 19, तर मनसे 2 जागांवर उमेदवार रिंगणात उतरवत आहे. दरम्यान, बेस्टच्या माझगाव येथील कर्मचारी बबिता पवार यांनी शिंदेसेना सोडून ठाकरे बंधूंच्या पॅनलमध्ये प्रवेश केला, यामुळे उत्कर्ष पॅनलला बळ मिळाल्याचं मानलं जात आहे.
कोणामध्ये होणार लढत?
ठाकरे बंधूंच्या कामगार संघटनांचे उत्कर्ष पॅनल आहे. तर, त्यांना भाजपच्या ‘सहकार समृद्धी पॅनल’ने आव्हान दिले आहे. या पॅनलमध्ये भाजप आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड यांच्या श्रमिक उत्कर्ष सभा, मंत्री नितेश राणे यांची समर्थ बेस्ट कामगार संघटना, शिंदेसेनेचे माजी आमदार किरण पावसकर यांची राष्ट्रीय कर्मचारी सेना यांच्या संघटनांचा समावेश आहे.
तर, विठ्ठलराव गायकवाड यांच्या मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन आणि उदय भट व जगनारायण कहार यांच्या बेस्ट कामगार संघटनेने स्वतंत्ररित्या ‘बेस्ट परिवर्तन पॅनल’ रिंगणात उतरवलं आहे.