माथेरान परिसरात यावर्षी अतिवृष्टीमुळे रेल्वे मार्गावर अनेक ठिकाणी माती वाहून गेली आणि काही ठिकाणी भूस्खलन झाले. विशेषतः कड्यावरचा गणपती परिसरात ट्रॅकखालील भाग कमकुवत झाल्याने सुरक्षा भिंत उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सततच्या पावसामुळे दुरुस्तीचा वेग मंदावला होता, मात्र आता रेल्वे प्रशासनाने कामाला गती दिली आहे. स्टेशन मास्तर गुरुनाथ पाटील यांनी अलीकडेच संपूर्ण मार्गाची पाहणी केली असून काही महत्त्वाची कामे पूर्ण झाल्यावर मालवाहू ट्रेनची ट्रायल घेण्यात येईल. त्यानंतरच नियमित प्रवासी सेवेचा शुभारंभ होणार आहे.
advertisement
नेरळ-माथेरान मिनी ट्रेन ही 1907 साली सर आदमजी पिरभाय यांनी सुरू केली होती. दरवर्षी 15 जूनला पावसाळ्यामुळे सेवा थांबवली जाते आणि दसऱ्याच्या सुमारास पुन्हा सुरू होते. या ट्रेनमुळे माथेरानच्या पर्यटनाला मोठी चालना मिळते. यंदा मात्र अनियमित हवामानामुळे ही परंपरा मोडीत निघाली असून पर्यटक आणि व्यापारी नाराज आहेत.
सध्या अमन लॉज ते माथेरान ही शटल सेवा सुरू असून मुसळधार पावसातही ती अखंडित चालू आहे. त्यामुळे माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांना काहीसा दिलासा मिळत आहे. हिवाळी हंगामात पर्यटकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे आणि 1 नोव्हेंबरपासून मिनी ट्रेन सुरू झाल्यावर माथेरान पुन्हा पर्यटकांनी गजबजून जाईल.






