अमोल सकपाळ असे या पोलीस हवालदाराचे नाव असून, तो मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील एका पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमोल सकपाळ मीरा रोड रेल्वे स्थानकातून विरारकडे येणाऱ्या लोकल ट्रेनच्या महिलांच्या डब्यात चढला होता. त्यानंतर, तो दारूच्या नशेत महिलांसाठी आरक्षित असलेल्या जागेवर जाऊन बसला. आरोपी पोलीस एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने महिला प्रवाशांशी अश्लील वर्तन करण्यास सुरुवात केली.
advertisement
त्याच्या या वर्तनामुळे महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही महिलांनी त्याला हटकले असता, त्याने त्यांनाही शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. अखेर, संतप्त महिलांनी वसई रेल्वे स्थानक आल्यावर वसई लोहमार्ग पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, पुढील तपास सुरू आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याकडूनच असे कृत्य घडल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. एक पोलीस कर्मचारीच अशाप्रकारे लोकल ट्रेनमध्ये शिरून महिलांशी अश्लील वर्तन केल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.