कुर्ला, घाटकोपरवासीयांसाठी गुड न्यूज
मुंबई महानगरपालिकेने घाटकोपर आणि कुर्ला परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठ्याबाबत दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कुर्ला एल विभागातील साईबाबा मंदिर, परे रावाडी, कुर्ला पश्चिम ते घाटकोपर क्रॉस कनेक्शन आणि घाटकोपर पश्चिम या भागात 150 मिमी व्यासाची नवीन मृदू पोलादी मुख्य जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. या कामामुळे येत्या दोन वर्षांत घाटकोपर आणि कुर्ला परिसरातील पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात दूर होणार आहे.
advertisement
मुंबई शहर आणि उपनगरांमधील अनेक जलवाहिन्या या खूप जुन्या झाल्या आहेत. या जलवाहिन्यांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे. पाण्याचा दाब वाढवताना अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. ही समस्या सोडवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने टप्प्याटप्प्याने जुन्या जलवाहिन्या बदलून नवीन जलवाहिन्या टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
याशिवाय जमिनीवरून जाणाऱ्या काही जलवाहिन्या आता जमिनीखालून टाकण्यात येणार आहेत. यामुळे पाण्याची चोरी आणि गळती मोठ्या प्रमाणात थांबेल असा पालिकेचा दावा आहे. कुर्ला आणि घाटकोपर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. त्यामुळे महापालिकेच्या जल अभियंता विभागाने या भागाचा सविस्तर अभ्यास केला आहे.
सध्या अस्तित्वात असलेल्या 1500 मिमी व्यासाच्या जलवाहिनीचे पुनर्वसन करण्यात येणार असून त्यासोबतच 1500 मिमी व्यासाची नवीन जलवाहिनीही टाकण्यात येणार आहे. या कामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या दहा ते पंधरा दिवसांत कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे.
जानेवारी 2026 पासून हे काम सुरू करण्याचे नियोजन असून पुढील दोन वर्षांत ते पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पाण्याचा दाब वाढवणे शक्य होणार आहे. तसेच पाण्याची गळतीही थांबेल. परिणामी घाटकोपर आणि कुर्ला परिसरातील नागरिकांना जास्त दाबाने आणि मुबलक पाणी मिळणार असल्याची माहिती महापालिकेच्या जल अभियंता विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
