मुंबई : मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील मालाड पश्चिम इथं एका बारमध्ये जेवणाच्या जागेवरून वाद झाला होता. या वादातून 5 जणांनी एका तरुणाची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुख्य आरोपीला अटक केली असून ४ जण फरार आहे. फरार आरोपींना शोध घेतला जात आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालाड पश्चिम येथील चिंचोली बंदर इथं असलेल्या गुरुकृपा बार अँड रेस्टॉरंटजवळ पहाटे ३ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ५ जणांनी मिळून एका व्यक्तीची हत्या केली. मृत व्यक्तीचे नाव कल्पेश भानुशाली आहे. गुरुकृपा बार अँड रेस्टॉरंटमधील जेवणावरून संजय मकवाना नावाच्या आरोपीचं मृत कल्पेश भानुशालीशी भांडण झालं होतं. त्यामुळे संजय मकवाना याने त्यांच्या ४ मित्रांना बोलावलं.
रेस्टॉरंटमध्ये आल्यानंतर संजय आणि त्याच्या चार मित्रांनी कल्पेशवर हल्ला चढवला. लाथा बुक्या आणि शस्त्रांनी कल्पेश भानुशालीवर हल्ला केला. तसंच त्यांच्या डोक्यात अनेक बिअरच्या बाटल्या फोडल्या. या हल्ल्यात कल्पेश गंभीर जखमी झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कल्पेशला स्थानिकांच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जिथे डॉक्टरांनी कल्पेश भानुशालीला तपासून मृत घोषित केलं.
या प्रकरणी मृत कल्पेशचा भाऊ परेश भानुशाली याने मालाड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे या हत्याकांडातील एका आरोपीला मालाड पोलिसांनी अटक केली आहे. ४ फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
बार उशिरापर्यंत चालू कसा होता?
मृताचा भाऊ म्हणतो की जर गुरुकृपा बार अँड रेस्टॉरंट इतक्या उशिरापर्यंत उघडलं नसतं तर माझ्या भावाचा जीव वाचला असता. जेवणाच्या कारणावरून हा वाद झाला आणि संजय मकवाना याने त्याच्या मित्रांसह माझ्या भावाला लाथा मारून आणि बिअरच्या बाटलीने आणि धारदार शस्त्राने हल्ला करून ठार मारलं, असा आरोप मृत कल्पेशचा भाऊ परेश भानुशाली याने केला आहे. मालाड पोलिसांनी आतापर्यंत एका आरोपीला अटक केली आहे आणि चार आरोपी फरार आहेत.
एका आरोपीला अटक
बुधवारी रात्री १:३० च्या सुमारास गुरुकृपा बार अँड रेस्टॉरंटजवळ हाणामारी झाली. ज्यामध्ये पाच जणांनी मिळून एका व्यक्तीची हत्या केली. ज्यामध्ये एका आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि ४ फरार आहेत. मालाड पोलीस पुढील तपास करत आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त संदीप जाधव यांनी दिली.