ठाणे : मुंबईमध्ये मध्य रेल्वे मार्गावर लोकलमधून प्रवासी पडून जखमी किंवा मृत्यू होण्याच्या घटना दररोज घडत असतात. या घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहे. पण यात आतापर्यंत कोणतीही अंमलबजावणी झाली नाही. अशातच मुलुंड ते कळवा दरम्यान लोकलमधून पडून एक तरुण प्रवाशी थेट खाडीत कोसळला. या तरुण बेपत्ता असून त्याचा शोध घेतला आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वे मार्गावर गुरुवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. मुलुंड ते कळवा रेल्वे स्थानकाच्या दरम्यान ही घटना घडली आहे. हा तरुण लोकलने कळव्याच्या दिशेनं प्रवास करत होता. विटावा खाडी जवळ आली असता अचानक या तरुणाचा तोल गेला आणि तो खाडीत कोसळला. अचानक झालेल्या या घटनेमुळे लोकलमध्ये खळबळ उडाली.
पुढच्या स्थानकावर लोकल थांबल्यानंतर याची माहिती तातडीने रेल्वे पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी विटावा खाडीकडे धाव घेतली. तोपर्यंत अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती दलाचे जवान आणि स्थानिक मच्छीमार खाडीत पोहोचले. 2 बोटीच्या सहाय्याने या तरुणाचा शोध घेतला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण कळव्यातील, गोलाई नगर इथं राहणार आहे. 19 वर्षाचा हा तरुण मुलुंडवरून कळव्याच्या दिशेने लोकलने प्रवास करत होता.
शोधकार्य थांबवलं
पोलीस, अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती दलाचे जवान आणि स्थानिक मच्छीमारांनी या तरुणाचा बऱ्याच वेळ शोध घेतला, पण या तरुणाचा काही शोध लागला नाही. रात्री अंधार झााल्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी पुन्हा या तरुणाचा शोध घेतला जाईल. या घटनेमुळे लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
'लोकलची दारं बंद करा'
काही दिवसांपूर्वीच मध्य रेल्वेवर दारात लोंबकाळत असताना काही प्रवासी हे धावत्या लोकलमधून खाली पडले होते. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर लोकलची दारं बंद करण्यात यावी, अशी मागणी समोर आली होती. यावर रेल्वे प्रशासनाकडून काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली होती.