देशभरातून दहशतवादी हल्ल्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना असदुद्दीन ओवैसी यांनीही पत्रकार परिषद घेऊन दोषींवर कारवाईची मागणी केली. पहलगाममधील दहशतवादी हल्ला अत्यंत निषेधार्ह आहे. यामागील जे कोणी जबाबदार आहेत, त्यांना कायद्यांतर्गत कठोर शिक्षा मिळायलाच हवी. आम्ही पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आहोत. मृतांच्या नातेवाइकांना मी संवेदना व्यक्त करतो आणि जखमींच्या लवकर व पूर्ण बरे होण्यासाठी प्रार्थना करतो, असे ओवेसी म्हणाले.
advertisement
हरामजादों ने धरम पूछकर... असदुद्दीन ओवैसींना संताप अनावर
अशा प्रकारच्या हिंसक हल्ल्यांना कोणतीही जागा नसावी आणि दोषींना माफ करून चालणार नाही. नालायक लोकांनी नावे आणि धर्म विचारून निष्पाप लोकांवर गोळ्या चालवल्या. यांना कदापि सोडता कामा नये. मात्र ज्या ठिकाणी इतके पर्यटक होते, तिथे एकही पोलिस कर्मचारी किंवा सीआरपीएफ कॅम्प का नव्हता? या प्रश्नाचे उत्तर सरकारने दिले पाहिजे, असेही ओवैसी म्हणाले.
दहशतवाद्यांनी सीमा ओलांडलीच कशी? पर्यटक जिथे गेले होते, तिथे पोलीस कसे नव्हते?
क्विक रिअॅक्शन टीमला (क्यूआरटी) घटनास्थळी पोहोचण्यासाठी एक तासापेक्षा जास्त वेळ लागला. लोकांच्या नावावरून, धर्मावरून त्यांना लक्ष्य करण्यात आले. दहशतवादी हे नक्कीच पाकिस्तानातून आले होते आणि पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठिंबा देतो, हे यानिमित्ताने पुन्हा सिद्ध झाले. पण प्रश्न आहे त्यांनी सीमा ओलांडलीच कशी? त्यासाठी कोण जबाबदार आहे? जर ते पहलगाममध्ये पोहोचले तर ते श्रीनगरलाही पोहोचू शकत होते... या प्रश्नांची उत्तरे सरकारने द्यावीत. सरकारने निष्पापांना न्याय देण्यासाठी कठोर पावले उचलावीत, आम्ही सरकारसोबत आहोत, असे ओवैसी यांनी स्पष्ट केले.
अमित शाह यांचा असदुद्दीन ओवैसी यांना फोन
पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी असदुद्दीन ओवेसी यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला. सर्वपक्षीय बैठक ही राष्ट्रासाठी मोठी आहे.गृहमंत्र्यांनी मला फोन करून मी कुठे आहे याची माहिती घेतली. त्यांनी मला बैठकीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले. मी लवकरात लवकर दिल्लीला जाण्याचा प्रयत्न करेन आणि सर्वपक्षीय बैठकीसाठी पोहोचेन..." असे ओवैसी यांनी सांगितले.