मागील दोन दिवसांपासून बद्रीनाथ धाममध्ये बर्फवृष्टी होत आहे. अशात माना-घस्तौलीला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर ग्लेशिअर फुटला आहे. अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे यात ५७ कामगार बर्फाखाली गाडल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेनंतर तातडीने स्थानिक प्रशासन आणि बीआरओच्या टीम्स घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. हे सर्व कामगार एका खासगी कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून काम करत होते.
advertisement
हे सगळे कामगार माना-घस्तौली राष्ट्रीय महामार्गालगत काम करत असताना अचानक ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि बीआरओ टीमने घटनास्थळी धाव घेतली. आपत्ती व्यवस्थापन सचिव विनोद सुमन यांनी सांगितले की, चमोली बद्रीनाथ धाममधील माना गावाजवळील ग्लेशिअर कोसळून ५७ कामगार गाडले आहेत. आतापर्यंत १६ जणांना वाचवण्यात यश आले आहे. उर्वरित ४१ कामगारांचा शोध सुरू आहे. दरम्यान, चमोलीचे जिल्हा दंडाधिकारी संदीप तिवारी म्हणाले की, दळणवळण व्यवस्था अत्यंत वाईट स्थितीत असल्याने योग्य माहिती मिळण्यात अडथळे येत आहेत.
हवामान खात्याने आधीच दिला होता अलर्ट
चमोलीच्या वरच्या भागात गेल्या काही दिवसांपासून जोरदार बर्फवृष्टी होत असल्याचे सांगण्यात येत आहे. हवामान खात्याने आजसाठी आधीच ऑरेंज अलर्ट जारी केला होता. ३२०० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या भागातही बर्फवृष्टीची शक्यता होती. हिमस्खलनाची भीतीही व्यक्त करण्यात आली. आता बद्रीनाथ मंदिरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या महामार्गाजवळ हिमस्खलन झाले आहे.