भीती, दडपण सगळं काही डोळ्यासमोर उभं राहिलं. कटकच्या प्रसिद्ध बाली यात्रेत उत्सवात ही धक्कादायक घटना घडली. बुधवारी रात्री उशिरा झालेल्या या दुर्घटनेत जवळपास 8 हून अधिक लोक अडकले होते. जाएंट स्वींग अचानक मध्यभागी थांबला आणि त्यात बसलेले आठ लोक जमिनीपासून तब्बल ३० फूट उंचीवर हवेत अडकले. या घटनेची माहिती तातडीनं पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांना दिली.
advertisement
दोन तास जीव मुठीत धरून...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत एक महिला आणि दोन लहान मुलांसह एकूण आठ जण अडकले होते. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बचावकार्य पूर्ण व्हायला जवळपास दोन तास लागले. खाली वाट पाहत असलेल्या कुटुंबीयांनी तो प्रसंग अंगावर काटा आणणारा होता असं सांगितलं. रात्रभर आकाशात जाएंट स्वींग स्थिर राहिला आणि अडकलेले लोक मदतीसाठी आरडा ओरडा करत होते, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
बचाव अधिकारी टी.के. बाबू यांनी सांगितले की, "बचावकार्य करताना आम्हाला जाएंट स्वींगचं वजन संतुलित ठेवावं लागलं. आतापर्यंत ८ लोकांना सुखरुप बाहेर काढलं. या सर्वांना बाहेर काढण्यासाठी आम्हाला दीड तासाहून अधिक वेळ लागला."
तात्काळ प्रशासकीय प्रतिसाद
हा अपघात घडताच कटकचे पोलीस उपायुक्तखिलारी हृषिकेश ज्ञानदेव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचाव कार्यावर देखरेख ठेवली. अग्निशमन दलाचे जवान हायड्रॉलिक लिफ्टसह त्वरित दाखल झाले. त्यांनी कोणतीही घाई न करता, काळजीपूर्वक एका-एका व्यक्तीला सुरक्षितपणे खाली आणले. या थरारक बचावकार्याला पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने यात्रेकरू जमा झाले होते आणि ते काळजीने परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.
अग्निशमन दलाच्या शौर्याचे कौतुक
ओडिशा अग्निशमन दलाच्या टीमने दाखवलेला संयम आणि शौर्य पाहून उपस्थित प्रेक्षकांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले. कोणतीही जीवितहानी न होता, बिघडलेल्या झोपाळ्यात अडकलेल्या आठही प्रवाशांना एक-एक करून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. बचावल्यानंतर, अडकलेल्या लोकांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले.
सुरक्षिततेच्या नियमांची चौकशी सुरू:
जाएंट स्वींग राइड बिघडण्याचे नेमके कारण काय होते, हे शोधण्यासाठी पोलिसांनी चौकशी सुरू केल्याची माहिती दिली आहे. सुरुवातीच्या माहितीनुसार, या अपघाताचे कारण यांत्रिक बिघाड किंवा त्याची देखभाल नीट झाली नाही अशी प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने या यात्रेमध्ये चालणाऱ्या सर्व मनोरंजक राइड्सच्या सुरक्षा मानकांचे कठोरपणे पालन केले जाईल, असे आश्वासन दिले आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
