जेडीयूच्या या निर्णयाला लालू प्रसाद यादव यांचाही पाठिंबा आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सीतामढीहून उमेदवारी मिळालेल्या देवेशचंद्र ठाकूर यांनी याचं उत्तर दिलं आहे. नीतिश कुमार आणि लालू यादव यांच्यासोबतच्या चर्चेनंतरच हा निर्णय झालाय. दोन्ही नेत्यांच्या आशिर्वादाने निवडणूक तयारीला सुरूवात केली आहे, असं ठाकूर यांनी सांगितलं. दुसरीकडे ललन सिंह यांनी लोकसभा निवडणूक लढण्यासाठी जेडीयूच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, त्यामुळे तेही निवडणूक लढणार हे निश्चित झालं.
advertisement
देवेशचंद्र ठाकूर आणि ललन सिंह यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर संजय झा यांचा निर्णय लालू यादव यांच्या सहमतीने झाला का? याबाबत अजून स्थिती स्पष्ट झालेली नाही, कारण या मतदारसंघातून आरजेडीचे अब्दुल बारी सिद्दीकी दावेदार आहेत.
जेडीयूला घाई का?
इंडिया आघाडीच्या बैठकीशिवायच जेडीयूने त्यांचे तीन उमेदवार निश्चित केले आहेत, त्यामुळे जेडीयूला जागावाटपाची एवढी घाई का आहे? याबाबत चर्चा सुरू झाली आहे. बिहारचे राजकीय विश्लेषक रवी उपाध्याय यांनी याबद्दलचं राजकारण सांगितलं आहे. जेडीयूच्या तीन उमेदवारांची नावं फायनल झाली याचा अर्थ जेडीयू आणि आरजेडी यांच्यातला ताळमेळ चांगला आहे, पण सोबतच जेडीयू आणि आरजेडीने काँग्रेसलाही संदेश दिल्याचं रवी उपाध्याय म्हणाले.
बिहारमध्ये जेडीयू आणि आरजेडी फ्रंटफूटवर खेळतील, हा मेसेज त्यांना काँग्रेसला द्यायचा आहे. जेडीयू आणि आरजेडी ज्या सीट देऊ शकते त्याच जागांबाबत काँग्रेसशी चर्चा होईल. इंडिया आघाडीच्या जागावाटपाबाबत अजून कोणतीही बैठक झालेली नाही, याबद्दलही नितीश कुमार यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे उमेदवारांची नावं जाहीर करून त्यांनी काँग्रेसवरचा दबाव वाढवला आहे, असं निरिक्षण रवी उपाध्याय यांनी मांडलं.