नवी दिल्ली/पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीए (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) मध्ये जागावाटपावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि जनता दल (युनायटेड) म्हणजेच जेडीयू या दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये समान जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे.
advertisement
एकूण 243 विधानसभा जागांपैकी भाजपला 101 आणि जेडीयूला 101 जागा मिळाल्या आहेत. उर्वरित जागा आघाडीतील लहान सहयोगी पक्षांना दिल्या गेल्या आहेत. त्यामध्ये चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ति पार्टी (रामविलास) ला 29 जागा, जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्तानी अवाम मोर्चा ला 6 जागा, आणि उपेंद्र कुशवाहा यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चा ला 6 जागा देण्यात आल्या आहेत.
“मोठ्या भावाची भूमिका” यावेळी संपली
निवडणूक जाहीर होण्यापूर्वी राजकीय वर्तुळात अशा चर्चा सुरू होत्या की- मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या जेडीयूला ‘मोठा भाऊ’ मानून भाजपपेक्षा काही जागा जास्त दिल्या जातील. त्या वेळी असा अंदाज वर्तवला जात होता की जेडीयूला 102 ते 103 जागा मिळू शकतात. मात्र आता स्पष्ट झाले आहे की भाजपने जेडीयूसोबत समसमान जागा वाटपाचा निर्णय घेतला आहे. दोन्ही पक्षांना 101-101 जागा देऊन “समान प्रतिष्ठा आणि समान जबाबदारी” या तत्त्वावर आघाडी पुढे जाणार आहे.
एनडीए एकत्र, मजबूत बहुमताचा दावा
या निर्णयानंतर बिहार भाजप अध्यक्ष दिलीप जायसवाल यांनी म्हटलं की- एनडीए पूर्णपणे एकजूट आहे. आमचं ध्येय स्पष्ट आहे. बिहारमध्ये पुन्हा एकदा मजबूत बहुमतासह सरकार स्थापन करायचं आहे. या समान जागावाटपाच्या निर्णयामुळे भाजप-जेडीयूतील तणाव कमी झाला असून, आगामी निवडणुकीसाठी आघाडी एकसंघपणे मैदानात उतरण्याची शक्यता अधिक वाढली आहे.
राजकीय तज्ञांच्या मते हा निर्णय समता, स्थैर्य आणि सामंजस्य या तत्त्वांवर आधारित आहे आणि तो एनडीएच्या नव्या रणनीतीचा भाग आहे. जिथे दोन्ही प्रमुख पक्षांना समान महत्त्व दिलं जात आहे.