नवी दिल्ली/ मेरठ: दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटात मेरठच्या मोहसिन (३२) या तरुणाचा मृत्यू झाला. भावाचा मृत्यू झाल्याचे कळताच मोहसिनचा भाऊ नदीम दिल्लीला पोहोचला आणि तेथून मृतदेह घेऊन मेरठला आला. मात्र त्यानंतर सुमारे 3 तासांनी मोहसिनची पत्नी सुल्ताना देखील मेरठला पोहोचली. मोहसिनचा मृतदेह दिल्लीतच दफन करण्याच्या तिच्या हट्टापायी सुल्ताना आणि तिची सासू संजीदा तसेच दीर नदीम यांच्यात जोरदार वाद झाला. जवळपास सहा तास हा संघर्ष सुरू होता. अखेरीस मोहसिनचा अंत्यसंस्कार दिल्लीतच करण्यावर कुटुंबाचे एकमत झाले आणि सुल्ताना पतीचा मृतदेह घेऊन दिल्लीला परतली.
advertisement
मोहसिन मूळचा मेरठमधील न्यू इस्लामनगर येथील रहिवासी होता. सुमारे दोन वर्षांपूर्वी तो पत्नी सुल्ताना आणि 10 वर्षांची मुलगी हिफजा व 8 वर्षांचा मुलगा आहद यांच्यासह रोजी-रोटीसाठी दिल्लीला गेला होता. तिथे तो ई-रिक्षा चालवत होता आणि जामा मशिदीजवळील पत्ता मोहल्ला येथे भाड्याच्या घरात राहत होता. सोमवारी संध्याकाळी मोहसिन प्रवाशांना घेऊन लाल किल्ल्याकडे जात असताना तेथे झालेल्या स्फोटात तो सापडला आणि त्याचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी मोहसिनचा मृतदेह मेरठला पोहोचताच घरात मोठा आक्रोश झाला.
मोहसिनचा मृतदेह मेरठला पोहोचल्यानंतर त्याची पत्नी सुल्ताना तिथे पोहोचली आणि तिने मृतदेह मेरठमध्ये दफन करण्यास ठामपणे नकार दिला. त्यामुळे वाद विकोपाला गेला. मोहसिनचा मृतदेह मेरठमध्येच दफन व्हावा यासाठी त्याची आई संजीदा यांनी सून सुल्तानाचे पाय धरले, तर सुल्तानानेही सासूचे पाय धरून पतीचा मृतदेह दिल्लीला घेऊन जाण्याची विनंती केली. या तणावामुळे परिसरात सुमारे 6 तास गोंधळाचे वातावरण होते. अखेरीस कुटुंबाने सुल्तानाची मागणी मान्य केली आणि मोहसिनचा मृतदेह दिल्लीला नेण्यात आला.
या घटनेमुळे मोहसिनच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. आई संजीदा यांनी रडत रडत सांगितले की, मी त्याला दिल्लीला जाण्यास मनाई केली होती, पण पत्नीच्या हट्टापायी तो ऐकला नाही. माझा मुलगा रोज 500-600 रुपये कमवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.
मानवतेच्या शत्रूंनी सर्व काही संपवले. आता या मुलांचे काय होणार?" पत्नी सुल्तानानेही संध्याकाळपासून मोहसिनला शंभरहून अधिक वेळा फोन केले, पण त्याने उचलला नाही. सकाळी कुटुंबाने आपल्याला न कळवताच मृतदेह मेरठला आणल्याचा तिचा आरोप होता, ज्यामुळे तिने मेरठमध्ये अंत्यसंस्कार करण्यास विरोध केला. दरम्यान नातेवाईक मोहम्मद युसूफ यांनी सुल्तानावर पैशाच्या लालसेपोटी हा वाद वाढवल्याचा आणि कुटुंबाला त्रास दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. मोहसिनच्या निधनामुळे त्याचे संपूर्ण कुटुंब अडचणीत आले आहे. तो आपल्या मुलांसाठी चांगले भविष्य घडवण्याचे स्वप्न पाहत होता, पण स्फोटामुळे त्याचे स्वप्न भंगले.
