मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, श्रीनगर शहरात गेल्या काही वेळापासून प्रचंड गोळीबार सुरू आहे. शहराच्या आकाशात सतत ड्रोन घिरट्या घालत असल्याचेही नागरिकांनी पाहिले आहे. ज्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिस्थितीची गंभीरता अधिक वाढवणारी बाब म्हणजे केवळ २० मिनिटांच्या कालावधीत ५० हून अधिक मोठे स्फोट झाल्याचे वृत्त आहे. शहरात एकूण ८० स्फोट झाल्याचे समोर आले आहे. हे स्फोट नेमके कशामुळे झाले आणि यामध्ये किती नुकसान झाले याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
advertisement
शस्त्रसंधीनंतर फक्त 30 मिनिटांनी पाकिस्तानला बसला पहिला शॉक; काहीच वाकडं...
श्रीनगरमधील अत्यंत संवेदनशील आणि प्रसिद्ध स्थळे जसे की दल सरोवर, ऐतिहासिक हरी पर्वत किल्ला आणि शहराचे हृदयस्थान असलेला लाल चौक हे हल्लेखोरांच्या निशाण्यावर असल्याची माहिती मिळत आहे. या वृत्तामुळे संपूर्ण काश्मीर खोऱ्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
त्याचबरोबर लडाख क्षेत्रातील कारगिलमध्येही वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला असून संपूर्ण परिसर अंधारात बुडाला आहे. हा वीजपुरवठा नेमका कशामुळे खंडित झाला याचाही तपशील अद्याप मिळू शकलेला नाही.
या दोन्ही घटनांमुळे जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये प्रचंड तणावाचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाल्या असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने पावले उचलली जात आहेत. नागरिकांना घरातच सुरक्षित राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जाण्याची शक्यता आहे. या घटनांबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.