पुणे: अपघातप्रवण क्षेत्र असलेल्या पुण्यातील नवले ब्रिजवर एक भीषण आणि विचित्र अपघात झाला असून यात ५ जणांचा होरपळून मृत्यू झाला तर २० जण जखमी झाल्याचे समजते. पुणे-बेंगळुरू महामार्गावरील नवले ब्रिजवर संध्याकाळच्या सुमारास दोन कंटेनरच्या मध्ये एक कार अडकली आणि गाडीतील सर्व प्रवासी ठार झाल्याचे समजते.
advertisement
या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान घटना स्थळावरून अपघाताच्या प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, एका कंटेनरचा ब्रेक फेल झाला आणि तो काही वाहनांना धडकत आला. शिवापूरच्या बाजूने एक कंटेनर येत होता. बहुदा त्याचा ब्रेक फेल झाला असावा. त्याने मागून एका कारला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की गाडीच्या पुढे असलेल्या एका कंटेनरला जाऊन धडकली. दोन्ही कंटेनरच्या मध्ये गाड अडकल्याने त्याचा स्फोट झाला.
सीएनजी कार दोन कंटेनरच्या मध्ये अडकल्याने त्याचा भीषण स्फोट झाला. आग अचानकपणे सर्वत्र पसरली. यात ८ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कंटेनरने ६ गाड्यांना धडक दिली
ज्या कंटेनरचा ब्रेक फेल झाला त्याने कारला धडक देण्याआधी आधी किमान ६ गाड्यांना धडक दिल्याचे समजते. अपघातानंतर कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. नवले ब्रिज ज्या ठिकाणी सुरू होतो तेथेच कंटेनरचा ब्रेक फेल झाला. कंटेनरने जवळ जवळ ७-८ गाड्यांना धडक दिली. यामुळे अपघातातील जखमींची संख्या वाढली आहे. ज्या कंटेनरचा ब्रेक फेल झाला त्याच्या चालकाचा देखील या अपघातात मृत्यू झाला आहे.
