काय म्हणाले धनंजय मुंडे?
आज पुन्हा पोरका झालो. माझे दादा मला पोरका करून गेले. माझे वडील गेल्यानंतर दादांनी मला वडील नसल्याचे कधी जाणवू दिले नाही. माझं आणि दादांचं नातं शब्दात सांगू शकत नाही, असं म्हणत धनंजय मुंडे यांना अश्रू अनावर झाले. संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न उराशी घेऊन झोपणार आणि भल्या पहाटे ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी कामाला लागणारा नेता; वेळेचे नियोजन, शिस्त यातून विकासाचा दरारा महाराष्ट्रात उभा करणारे दादा आज महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला स्तब्ध करून आणि आम्हा सर्वांना दुःखाच्या छायेत सोडून निघून गेले, असंही धनंजय मुंडे म्हणाले.
advertisement
धनंजय वेळेवर ये बरका...
दादांचं अकाली निधन ही घटनाच मुळात हृदयाला न पटणारी आहे. आमचे राजकीय अस्तित्व दादांच्या जीवावर होते... त्यामुळे अजूनही असं वाटतंय की आत्ता दादांचा फोन येईल आणि म्हणतील, धनंजय वेळेवर ये बरका... त्यामुळे श्रद्धांजली हा शब्दच फुटत नाहीये. देशाची, राज्याची, पक्षाची, माझ्या बीड जिल्ह्याची आणि माझी कधीही न भरून निघणारी हाणी, असं धनंजय मुंडे म्हणाले.
पाच जणांच्या मृत्यूची पुष्टी
दरम्यान, हाती आलेल्या माहितीनुसार, पवार एका खासगी चार्टर्ड विमानाने मुंबईहून बारामतीला गेले होते. लँडिंग दरम्यान विमान धावपट्टीवरून घसरले. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) या अपघातात पाच जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. सुरुवातीला सहा जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त होते.
