घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत त्या तरुणाला पकडले. त्यानंतर त्याला तातडीने सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर संबंधित तरुणाला रेबीज नसून तो मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांच्या प्राथमिक तपासणीत त्याच्यात गंभीर मानसिक अस्थिरतेची लक्षणे आढळून आली.
Ration: खायला धान्य नाही, पिंपरीकर 3 दिवसांपासून रांगेत, नेमकं घडलं काय?
advertisement
या घटनेनंतर मानसिक आजाराबाबत समाजात असलेले गैरसमज पुन्हा एकदा समोर आले आहेत. अनेकदा अशा रुग्णांच्या विचित्र वागणुकीमुळे त्यांना संसर्गजन्य आजार असल्याचा समज केला जातो, मात्र वास्तव वेगळे असते. याबाबत माहिती देताना डॉ. गणेश जाधव यांनी सांगितले की, मनोरुग्णता हा मेंदूचा आजार आहे. जसे बीपी किंवा मधुमेह हा शरीराचा आजार आहे, तसेच मानसिक आजार हा मेंदूशी संबंधित विकार आहे. योग्य वेळी आणि नियमित उपचार घेतल्यास 70 ते 80 टक्के रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात.
डॉ. जाधव यांच्या मते, मानसिक आजाराची प्रमुख कारणे म्हणजे वाढता ताणतणाव, कौटुंबिक वाद, अस्थिर कौटुंबिक वातावरण तसेच आर्थिक अडचणी. अनेक वेळा घरातील व्यक्ती मानसिक आजाराने त्रस्त असल्यास त्याला कुटुंबाकडून अपेक्षित आधार मिळत नाही. काही प्रकरणांमध्ये अशा व्यक्तींना घराबाहेर काढले जाते, ज्यामुळे त्यांची अवस्था अधिकच बिकट होते. उपचारांचा खर्च परवडत नसल्यामुळेही अनेक रुग्ण उपचारांपासून वंचित राहतात आणि आजार बळावतो.
मानसिक आजाराच्या उपचारांमध्ये औषधांइतकाच कुटुंबाचा मानसिक आधार महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. समाजाने अशा रुग्णांकडे सहानुभूतीने पाहावे, असे आवाहन त्यांनी केले. रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी अशा अवस्थेतील व्यक्ती आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता पोलिसांना किंवा तातडी सेवेसाठी ॲम्ब्युलन्सला माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.





