यंदाही गौरींचे रेखीव, सुबक आणि आकर्षक मुखवटे बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसचे मुखवटे दीड हजार रुपयांपासून पुढे मिळतात, तर शाडूच्या मुखवट्यांची किंमत अडीच हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत आहे. फायबर मूर्ती चार हजारांपासून सुरू होतात. पितळी मुखवटे मात्र फारच मोजक्या दुकानांत मिळतात, त्यामुळे त्याला वेगळी मागणी आहे.
advertisement
सजावटीच्या साहित्याची विविधता ग्राहकांना आकर्षित करत आहे. तोरण, रोषणाईच्या माळा, कुंदनच्या माळा, मखरे, सजावट केलेले चौरंग-झोपाळा, विजेवर चालणारे कारंजे, तसेच मखराचे वेगवेगळे प्रकार यंदाही उपलब्ध आहेत. पारंपरिक सजावटीबरोबरच आधुनिक पद्धतीचे डेकोरेशनही ग्राहक पसंत करताना दिसत आहेत.
या सणात महिलांची खास उत्सुकता दागिन्यांकडे असते. पारंपरिक दागिन्यांबरोबरच खड्यांच्या आणि मोत्यांच्या दागिन्यांना यंदा विशेष मागणी आहे. नाजूक बाजूबंद, कंबरपट्टा, नेकलेस, तसेच डिझायनर नथ महिलांच्या आवडीस उतरल्या आहेत. चांदीवर सोन्याचा मुलामा असलेले दागिनेही लोकप्रिय ठरत आहेत. विशेष म्हणजे हे दागिने आकर्षक दिसत असून किफायतशीर दरात उपलब्ध आहेत.
व्यापारी सांगतात की मागील काही दिवसांपासून बाजारपेठेत खरेदीची लगबग वाढली आहे. महिलांचा सहभाग विशेषतहा जास्त असून गौरींच्या आरासासाठी नवनवीन गोष्टींची निवड करताना त्या उत्साहाने खरेदी करत आहेत. ''पारंपरिक दागिन्यांसोबतच डिझायनर दागिन्यांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे,'' अशी माहिती विक्रेते रवींद्र रणधिर यांनी दिली.
गौरी आगमनाच्या निमित्ताने बाजारपेठा सजल्या असून घराघरांतही तयारीचा उत्साह ओसंडून वाहतो आहे. सजावट, मुखवटे, दागिने आणि अलंकार यामुळे या सणाला वेगळेच आकर्षण लाभले आहे. पारंपरिकतेसोबत आधुनिकतेचा मेळ साधत, गौरी आगमनाचा उत्सव महिलांसाठी आनंदाचा आणि उत्साहाचा सोहळा ठरत आहे.