टिंगरेनगर येथील रहिवासी अमन सिंग सुरेंद्र सिंग गचंड हा 29 डिसेंबर रोजी सकाळी घरातून त्याच्या दुचाकीवरून बाहेर पडला. कामावर जात असल्याचं त्याने घरामध्ये सांगितलं, पण रात्री उशिरापर्यंत तो घरी आला नाही, त्यामुळे त्याची आई अनिता सुरेंद्र सिंग गचंड (वय 44) यांनी नातेवाईक आणि अमन याच्या मित्रांना फोन करून चौकशी केली, पण तरीही अमन सापडत नसल्यामुळे आईने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली.
advertisement
'मुलगा बेपत्ता झाल्यामुळे तसंच तो अल्पवयीन असल्यामुळे आम्ही तातडीने शोध सुरू केला. गुन्हे शाखेच्या पथकाने मुलाचा मोबाईल फोनचे रेकॉर्ड आणि तो बेपत्ता झाला त्या दिवसाचं त्याच्या लोकेशनची माहिती गेतली. तांत्रिक तपासाच्या आधारे आम्हाला त्याचं शेवटचं लोकेशन कात्रज परिसरात आढळलं', असं पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) निखील पिंगळे यांनी सांगितलं.
अमनला जाळ्यात ओढलं
अमन सोशल मीडियावर एका मुलीच्या संपर्कात आला होता. आरोपींनी अमनसोबत मैत्री करण्यासाठी महिलेची फेक प्रोफाइल तयार केली. अमनचा विश्वास संपादन केल्यानंतर त्याला कात्रजच्या घाटात भेटायला बोलावण्यात आलं, पण अमनला सापळ्याची माहिती नव्हती.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख प्रथमेश चिंदू अधल (19) आणि नागेश बालाजी ढाबाले (19) अशी झाली आहे, दोघेही शिवणे येथील रहिवासी आहेत. याशिवाय 16 आणि 17 वर्षांचे इतर दोन आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपींचा कर्नाटकातील बेळगावपर्यंत माग काढला आणि त्यांना ताब्यात घेतले.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पीडितेला कात्रजमध्ये अडवण्यात आले आणि खेड-शिवापूरमधील एका निर्जन डोंगराळ भागात नेण्यात आले. "आरोपींनी आम्हाला सांगितले आहे की त्यांनी दगड आणि धारदार शस्त्रांनी मुलावर हल्ला केला ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. नंतर पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्नात मृतदेह डोंगरात पुरण्यात आला. जुन्या वादातून हत्या केल्याचं आरोपींनी कबूल केलं आहे. अमनने आम्हाला शिवणे परिसरात राहत असताना त्रास दिला होता, त्यातून हत्येचा कट रचल्याचं आरोपींनी सांगितलं आहे. आरोपींनी माहिती दिल्यानंतर स्थानिक तहसीलदारांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढण्यात आला. याप्रकरणी दोन प्रौढ आरोपींना 9 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या गुन्ह्यामध्ये ज्या मुलीच्या सोशल मीडिया अकाउंटचा वापर झाला, तिच्या प्रोफाईलचा आरोपींनी गैरवापर केला का? याचा शोधही पोलीस घेत आहेत.
कात्रज घाटात बोलवून तरुणाला मारहाण
याआधी डिसेंबर महिन्यामध्ये अशाचप्रकारे मुलीने पुण्यातल्याच एका तरुणाला कात्रज घाटात बोलवून बेदम मारहाण केली होती. सोशल मीडियावरून तरुणीने तरुणासोबत मैत्री केली आणि त्याला कात्रज घाटात भेटायला बोलावलं. तरुणीच्या गोड बोलण्याला हा तरुण भाळला आणि दुचाकी घेऊन कात्रज घाटात पोहोचला. तिथे तरुणी आणि तिचे मित्र दबा धरून बसले होते. तरुण आणि तरुणी दुचाकीवरून निघाले तेव्हा काही अंतर कापल्यानंतर तरुणीच्या मित्रांनी दोघांना अडवलं आणि तरुणाला मारहाण सुरू केली. मुलगी आणि तिच्या मित्रांनी तरुणाकडे 70 हजार रुपये मागितले आणि 10 हजार रुपये जबरदस्तीने घेतले.
पैसे घेतल्यानंतरही पुढचे काही तरुणी आणि तिच्या मित्रांनी तरुणाला उरलेल्या पैशांसाठी ब्लॅकमेल करायला सुरूवात केली. पैसे दिले नाहीत तर लैंगिक शोषण आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकीही दिली, यानंतर तरुणाने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
