आरएसव्हीमुळे सर्दी, खोकला, ताप आणि श्वास घेण्यास त्रास होतो. गंभीर प्रकरणांमध्ये श्वासोच्छवास कठीण होऊन रुग्णालयात दाखल होणे आवश्यक असते आणि ऑक्सिजन सपोर्ट लागतो. जागतिक पातळीवर 2019 मध्ये सुमारे 33 दशलक्ष तीव्र श्वसनसंस्थेचे संसर्ग नोंदले गेले, ज्यामुळे 30 लाखांहून अधिक रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. त्याच वर्षी 5 वर्षांखालील मुलांमध्ये अंदाजे 26,300 मृत्यूही नोंदवले गेले.
advertisement
भारतासमोर लहान मुलांमधील श्वसनविकार मोठे आव्हान ठरले असून, न्यूमोनिया, ब्रॉन्कायटिस, दम्याचे आजार आणि हंगामी विषाणूजन्य संसर्गाचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. यामागचे प्रमुख कारण म्हणजे वायुप्रदूषण, हवामानातील अचानक बदल, कुपोषण आणि अपूर्ण लसीकरण. राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणानुसार, भारतातील पाच वर्षांखालील मुलांमध्ये मृत्यूचे मुख्य कारण अजूनही श्वसनसंस्थेचे आजार आहेत. दरवर्षी न्यूमोनियामुळे अंदाजे 1.2 लाख बालमृत्यू होतात.
प्रदूषणामुळे शहरी झोपडपट्ट्यांमध्ये मुलांचे फुफ्फुस प्रभावित होतात, ज्यामुळे दीर्घकालीन दम्याची शक्यता वाढते. ग्रामीण भागात लसीकरणाबाबत जागरूकतेअभावी मुलांना न्यूमोनिया आणि इन्फ्लूएंझाविरोधी लस मिळत नाही. पालक अनेकदा खोकला-ज्वराकडे दुर्लक्ष करतात, परिणामी आजार तीव्र स्वरूपात प्रकट होतो.
तज्ज्ञांच्या मते, पाच वर्षांखालील मुलांची रोगप्रतिकारक शक्ती अपुरी असल्यामुळे ते आरएसव्ही, न्यूमोनिया आणि ब्रॉन्किओलायटिससारख्या संसर्गासाठी असुरक्षित असतात. मुंबईसारख्या प्रदूषित महानगरांमध्ये घराबाहेरील प्रदूषण संसर्ग वाढवते. लक्षणांमध्ये असामान्य थकवा, जलद श्वासोच्छवास, ऑक्सिजनची कमतरता, दूध किंवा आहार कमी होणे, लघवी कमी होणे यांचा समावेश होतो आणि अशा परिस्थितीत त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर काही प्रतिबंधात्मक इंजेक्शन उपलब्ध आहेत. रेड्डीज लॅबोरेटरीज आणि सनोफी हेल्थकेअरच्या भागीदारीत भारतात निरसिव्हमॅब नावाचे प्रीफिल्ड मोनोक्लोनल अँटीबॉडी इंजेक्शन उपलब्ध आहे. हे नवजात बाळे आणि 24 महिन्यांपर्यंतच्या मुलांना आरएसव्ही संसर्गापासून संरक्षण करते. तथापि, उच्च किंमतीमुळे गरीब कुटुंबांसाठी उपलब्धता मर्यादित आहे.तसेच झिरसोवीर फेज तीन या औषधाचे ट्रायल्स आरएसव्ही संसर्गासाठी सुरु आहेत.