बलकवडे म्हणाले, “महाराष्ट्राने जे सीबीएसई पॅटर्न स्वीकारले आहे, त्यामध्ये मराठा साम्राज्य व शिवाजी महाराज यांचा इतिहास केवळ दोन पानांपुरता सीमित करण्यात आला आहे. ही बाब अत्यंत दुर्दैवी असून, इतिहासावर अन्याय करणारी आहे. 2008 साली जेव्हा सीबीएसई अभ्यासक्रमाची रचना झाली, तेव्हाही सातवीच्या पुस्तकात फक्त तीन ओळींच्या माध्यमातून शिवरायांचा उल्लेख केला गेला होता. मराठ्यांच्या 2200 पानांच्या गौरवशाली इतिहासासाठी फक्त दोन पानं देणं म्हणजे अपमानच आहे.”
advertisement
“पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांना देशाचा आदर्श मानतात. जर खरोखरच महाराजांना पिढीचा आदर्श ठरवायचं असेल, तर त्यांचा इतिहास योग्य प्रमाणात व आदराने अभ्यासक्रमात असायला हवा. शिवाजी महाराजांनी केवळ परकीय सत्तांविरुद्ध संघर्ष केला नाही, तर लोककल्याणकारी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली,” असंही बलकवडे म्हणाले.
राज्य सरकार एनसीईआरटीचा अभ्यासक्रम स्वीकारत असेल, तर इंग्रजी आणि गणित यांसारख्या विषयांसाठी राष्ट्रीय समानता चालू शकते. मात्र इतिहासासारख्या संवेदनशील विषयासाठी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक महत्त्वाची जाणीव ठेवून, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने तयार केलेली पुस्तकंच वापरण्यात यावीत. इतिहास हे केवळ माहितीच नव्हे तर मूल्यांचं शिक्षण देणारे माध्यम आहे. युवापिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास शिकवला गेला पाहिजे, तरच त्यांच्यात नेतृत्व, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक भान विकसित होईल, असं बलकवडे म्हणतात.