मावळ तालुक्यातील कुरवंडे गावातून उगम पावलेली इंद्रायणी नदी देहू आणि आळंदी या पवित्र क्षेत्रातून वाहत तुळापूर येथे भीमा नदीला मिळते. पुढे भीमा नदी मुळा-मुठेच्या संगमातून उजनी धरण मार्गे पंढरपूरकडे प्रवास करते. पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीत या नदीचा सुमारे 18.80 किलोमीटर पट्टा आहे.
पुण्यात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार, का आणि कुठं? पाहा सविस्तर
advertisement
पिंपरी-चिंचवड शहरात प्रवेश करताच घरगुती सांडपाणी, गटारी आणि औद्योगिक नाले थेट नदीत मिसळतात. त्यामुळे पाण्याचा रंग बदलून निर्मळ प्रवाहाचे दूषित नाल्यात रूपांतर होत आहे. या वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने ‘इंद्रायणी सरोवर पुनरुज्जीवन प्रकल्प’ आखला आहे. या प्रकल्पाला सप्टेंबर महिन्यात राज्यस्तरीय तांत्रिक समितीची मान्यता मिळाल्यानंतर आता राज्य सरकारकडून प्रशासकीय मंजुरीही देण्यात आली आहे.
प्रदूषणमुक्त आणि सुंदर करण्यासाठी मोठा प्रकल्प
या प्रकल्पातून नदीसंवर्धन, पूरनियंत्रण, पाण्याची शुद्धीकरण प्रक्रिया आणि सुशोभीकरण या चारही बाबी साध्य केल्या जाणार आहेत. पावसाचे पाणी वाया जाऊ नये म्हणून जलनिस्सारण प्रणाली तयार केली जाणार आहे. प्रदूषित पाणी थेट नदीत जाण्याऐवजी ते ‘इंटरसेप्टर लाईन’द्वारे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाकडे वळवले जाणार आहे.
पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दगडी बांधकाम आणि नदीकाठांची मजबुतीकरणाची कामे हाती घेतली जातील. तसेच, नदीच्या तटांवर हरित पट्टा आणि वृक्षारोपणाद्वारे नैसर्गिक सौंदर्य वाढवले जाणार आहे. चिखली परिसरात रिव्हर रेसिडन्सी आणि स्मशानभूमी जवळ अनुक्रमे 40 आणि 20 एमएलडी क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू आहे.
‘इंद्रायणी’ सरोवर पुनरुज्जीवन प्रकल्पास राज्य शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे लवकरच निविदा प्रक्रिया राबविली जाईल. महापालिका हद्दीतून वाहणाऱ्या 18.80 किलोमीटर नदी पात्राचे पुनरुज्जीवन केले जाईल, असे महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले.






