सुरेखा माऊली गोरे (रा. खोपी, ता. भोर) या १२ डिसेंबर २०२५ रोजी कात्रज येथून एका रिक्षात बसून वेळू फाटा येथे उतरल्या. मात्र, घाईगडबडीत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असलेली त्यांची पिशवी त्यांच्याकडून अनावधानाने रिक्षामध्येच विसरली गेली. ही गोष्ट त्यांच्या लक्षात येईपर्यंत रिक्षा खूप पुढे निघून गेली होती. रिक्षाचालकाचा कोणताही संपर्क क्रमांक किंवा माहिती नसल्याने त्यांनी खूप शोधाशोध केली, पण त्यांना यश आलं नाही. त्यांनी मौल्यवान वस्तू गमावल्याचं दु:ख त्यांच्या कुटुंबाला झालं होतं.
advertisement
दोन दिवस उलटून गेल्यानंतर, म्हणजेच १४ डिसेंबर २०२५ रोजी, ससेवाडी (ता. भोर) येथील रिक्षाचालक गणेश वाडकर यांनी मोठ्या प्रामाणिकपणे आणि प्रयत्नाने सुरेखा माउली गोरे यांचा शोध घेतला. कोणतीही वस्तू न काढता, गणेश वाडकर यांनी ती बॅग जशीच्या तशी सर्व वस्तूंसह गोरे यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात सुपूर्द केली.
गणेश वाडकर यांनी दाखवलेला हा प्रामाणिकपणा आजच्या काळात अत्यंत कौतुकास्पद आहे. या कृतीतून त्यांची नैतिक मूल्ये आणि सामाजिक बांधिलकी स्पष्टपणे दिसून येते. सुमारे ४ ते ५ लाखांची रक्कम आणि दागिने परत केल्याबद्दल परिसरातील नागरिकांकडून गणेश वाडकर यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
