निर्जन परिसर, दाट जंगल अन् काळोख; राजगडाच्या कादवे डोंगरावर अडकलेला युवक रात्रभर ओरडत राहिला, अन् सकाळी...
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
रात्र झाली तसा आजूबाजूला अंधार पसरला. मदतीसाठी आवाज देऊन देऊन त्याचा घसा कोरडा पडला, पण निर्जन परिसर, दाट जंगल आणि रात्रीचा अंधार यामुळे त्याचा आवाज कोणापर्यंत पोहोचू शकला नाही.
पुणे: पुण्यातील राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या कादवे डोंगरावर एक अतिशय थरारक घटना घडली. उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथील रहिवासी असलेला दीपेश वर्मा (वय २१) हा तरुण काल रात्री कादवे डोंगरावर एकटाच फिरण्यासाठी गेला होता. अंधार आणि अवघड भूभागाचा अंदाज न आल्यामुळे तो थेट एका खोल दरीच्या वरच्या बाजूला असलेल्या धोकादायक कड्याच्या मध्यभागी अडकला. वर जाण्याची वाट बंद आणि खाली खोल दरी असल्यामुळे त्याची मोठी कोंडी झाली.
संपूर्ण रात्रभर दीपेश याच असहाय्य अवस्थेत अडकून पडला होता. माघारी परतण्याची वाटही बिकट असल्याने त्याला काहीच सुचत नव्हते. रात्र झाली तसा आजूबाजूला अंधार पसरला. मदतीसाठी आवाज देऊन देऊन त्याचा घसा कोरडा पडला, पण निर्जन परिसर, दाट जंगल आणि रात्रीचा अंधार यामुळे त्याचा आवाज कोणापर्यंत पोहोचू शकला नाही. थंडी असूनही त्याला भीतीने घाम फुटला होता. रात्रभर तग धरून त्याने कसाबसा पहाट होण्याची वाट पाहिली.
advertisement
दुसऱ्या दिवशी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास, त्या परिसरात असलेले स्थानिक नागरिक राहुल ठाकर यांना "बचाव... बचाव..." असा खूप क्षीण आवाज ऐकू आला. परिस्थितीची गंभीरता ओळखून राहुल ठाकर यांनी जराही वेळ न घालवता तात्काळ वेल्हा पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच रेस्क्यू ऑपरेशन (बचाव कार्य) तातडीने सुरू करण्यात आले.
advertisement
पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे दीपेश वाचला. अत्यंत कठीण आणि धोकादायक अशा डोंगराळ भागात बचाव पथकाने योग्य समन्वय साधत, जीवाचा धोका पत्करून कड्याच्या मध्यभागी अडकलेल्या दीपेश वर्मा याच्यापर्यंत पोहोचले.
सुमारे काही तासांच्या प्रयत्नांनंतर, कुशल बचाव तंत्राचा वापर करत रेस्क्यू टीमला दीपेशला कड्यातून सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आले. या संपूर्ण थरारक बचावकार्यात सहभागी झालेल्या रेस्क्यू सदस्यांनी धैर्य, कौशल्य आणि सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट दर्शन घडवले. बाहेर काढल्यानंतर दीपेशची प्राथमिक चौकशी करण्यात आली आणि त्याला त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. स्थानिक प्रशासन, पोलीस, रेस्क्यू टीम आणि ग्रामस्थ यांच्या तत्परतेमुळे एक मोठा अनर्थ टळल्याबद्दल नागरिकांकडून कौतुक होत आहे. डोंगराळ आणि धोकादायक भागात फिरताना योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमचे अध्यक्ष तानाजी भोसले यांनी यानिमित्ताने केले आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 15, 2025 11:25 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
निर्जन परिसर, दाट जंगल अन् काळोख; राजगडाच्या कादवे डोंगरावर अडकलेला युवक रात्रभर ओरडत राहिला, अन् सकाळी...









