'सिंगापूरमध्ये बंपर पगाराची नोकरी देतो'; ऑनलाइन 'जॉब स्कॅम'मध्ये पुण्यातील काकांना 10 लाखाचा गंडा
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
आरोपींनी त्यांना सिंगापूरमध्ये नोकरी मिळवून देण्याचं आमिष दाखवलं आणि दरमहा भारतीय चलनात सुमारे १६ ते १७ लाख रुपये एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी देण्याचे आश्वासन दिले
पिंपरी-चिंचवड: 'सिंगापूरमध्ये आकर्षक पगाराची नोकरी' देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची तब्बल १० लाख ४४ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना २१ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर २०२५ दरम्यान आकुर्डी परिसरात घडली. याप्रकरणी गोकुळ हिम्मतराव गाजरे (वय ४७, रा. आकुर्डी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या ऑनलाइन माध्यमातून नोकरीच्या शोधात असलेल्या गोकुळ गाजरे यांना संशयित आरोपींनी संपर्क साधला. आरोपींनी त्यांना सिंगापूरमध्ये नोकरी मिळवून देण्याचं आमिष दाखवलं आणि दरमहा भारतीय चलनात सुमारे १६ ते १७ लाख रुपये एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी देण्याचे आश्वासन दिले. ही आकर्षक ऑफर पाहून गाजरे यांनी आरोपींवर विश्वास ठेवला.
advertisement
नोकरीचे आमिष दाखवल्यानंतर आरोपींनी तुषार कुमार, संजय बोसे, अनिल आदिवासी यांसह आठ बँक खातेधारकांच्या माध्यमातून गाजरे यांच्याकडून वेगवेगळ्या कारणांसाठी वेळोवेळी पैशांची मागणी केली. यामध्ये व्हिसा प्रक्रिया शुल्क, कागदपत्र पडताळणी शुल्क, नोकरीची ऑफर लेटर शुल्क आणि इतर प्रशासकीय खर्चांचा समावेश होता. या मागणीनुसार फिर्यादीनी १० लाख ४४ हजार ६५० रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांवर ट्रान्सफर केले.
advertisement
मात्र, इतकी मोठी रक्कम भरूनही फिर्यादीना नोकरी मिळाली नाही आणि आरोपींनी त्यांच्याशी संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी निगडी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी तुषार कुमार, संजय बोसे, अनिल आदिवासी आणि रक्कम जमा करण्यात आलेल्या आठ बँक खातेधारकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अशा प्रकारे विदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखवून होणाऱ्या सायबर फसवणुकीपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 15, 2025 8:56 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
'सिंगापूरमध्ये बंपर पगाराची नोकरी देतो'; ऑनलाइन 'जॉब स्कॅम'मध्ये पुण्यातील काकांना 10 लाखाचा गंडा











