ही वाढती मागणी लक्षात घेऊन पुणे रेल्वे प्रशासनाने दिवाळी आणि छठपूजेच्या काळात विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. 22 ऑक्टोबरपासून 15 नोव्हेंबर या कालावधीत पुणे विभागातून अनेक विशेष गाड्या धावणार आहेत. यामध्ये पुणे–सावंतवाडी, सावंतवाडी–पुणे, नागपूर–पुणे, पुणे–नागपूर, पुणे–जोधपूर, जोधपूर–पुणे, पुणे–गोरखपूर, गोरखपूर–पुणे, पुणे–दरभंगा, दरभंगा–पुणे, पुणे–लखनौ आणि लखनौ–पुणे या मार्गांवर विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. गर्दी आणखी वाढल्यास अतिरिक्त फेऱ्याही सोडल्या जाणार आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
advertisement
मात्र, प्रवाशांना या विशेष गाड्यांसाठी नियमित गाड्यांच्या तुलनेत 30 टक्के अधिक तिकीट दर मोजावा लागेल. रेल्वे बोर्डाकडून हंगामी कालावधीत धावणाऱ्या या गाड्यांचे भाडे नियमित गाड्यांपेक्षा महाग असते. त्यामुळे प्रवासाचा खर्च वाढणार असला तरी पर्याय नसल्यामुळे प्रवाशांना या गाड्यांचा आधार घ्यावा लागणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी आणि छठपूजेच्या काळात रेल्वे तिकीट मिळवण्यासाठी चढाओढ होणार आहे.
दिवाळीत पुणे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळते. त्यामुळे या वर्षी रेल्वे प्रशासनाने भार कमी करण्यासाठी हडपसर स्थानकावरून जास्तीत जास्त गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पुणे स्थानकावरील गर्दी काही प्रमाणात कमी होणार असून, प्रवाशांना प्रवासासाठी हडपसर स्थानकावर जाण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
एकंदरीत, दिवाळी आणि छठपूजेच्या काळात प्रवाशांच्या वाढत्या गर्दीला तोंड देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. जरी तिकीट दर महाग असले तरी गावी जाण्यासाठी प्रवाशांना या विशेष गाड्यांचाच आधार घ्यावा लागणार आहे. पुणे आणि परिसरातील नागरिकांसाठी या गाड्या सोयीस्कर ठरणार आहेत.