सरकारने या उपक्रमासाठी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची संनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंदिरांच्या इतिहासाशी निगडीत वास्तू आणि शिल्पकला सुरक्षित ठेवणे, भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करणे आणि परिसराचे सौंदर्य वाढवणे हे या उपक्रमामागचे उद्दिष्ट आहे.
निधीचे वाटप असे करण्यात येईल?
पुणे जिल्हा
advertisement
मयुरेश्वर मंदिर (मोरगाव, बारामती) : ₹8.57 कोटी
चिंतामणी मंदिर (थेऊर, हवेली) : ₹4.78 कोटी
विघ्नेश्वर मंदिर (ओझर, जुन्नर) : ₹4.45 कोटी
महागणपती मंदिर (रांजणगाव, शिरूर) : ₹8.70 कोटी
रायगड जिल्हा
वरदविनायक मंदिर (महड) : ₹15.12 कोटी
अहिल्यानगर जिल्हा
सिद्धिविनायक मंदिर (सिद्धटेक, कर्जत) : ₹9.47 कोटी
कोणती कामे होणार?
मंदिरांच्या वास्तूंचे जीर्णोद्धार करताना धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला धक्का न लावता संवर्धनाची कामे केली जाणार आहेत.
मयुरेश्वर मंदिर, मोरगाव : नंदी मंडप, मूषक मंडप आणि नगारखान्याचे जतन केले जाईल. नवीन दगडी प्रवेशद्वार उभारले जाईल. अतिक्रमणे हटवून दीपमाळांचे संवर्धन आणि मंदिर परिसराचे विद्युतीकरण केले जाणार आहे.
चिंतामणी मंदिर, थेऊर : मंदिर आवारातील जुन्या दगडी फरशीवर बसविलेले पेव्हर काढले जातील. नवीन भिंती बांधल्या जातील, तसेच दारे-खिडक्यांची दुरुस्ती होईल.
विघ्नेश्वर मंदिर, ओझर : येथे दीपमाळांची दुरुस्ती होणार असून, मंदिराभोवती तटबंदी उभारली जाईल. मंडपाचे देखील काम केले जाणार आहे.
महागणपती मंदिर, रांजणगाव : प्रवेशद्वारावर कमान बांधली जाईल. दर्शनबारीच्या लाकडी छताची दुरुस्ती केली जाईल, तसेच नक्षीकाम होईल.
वरदविनायक मंदिर, महड : येथे नवीन सभामंडप उभारण्यात येईल. भाविकांसाठी आवश्यक सुविधा उभारल्या जातील आणि दीपमाळांची दुरुस्ती केली जाईल.
सिद्धिविनायक मंदिर, सिद्धटेक : प्रवेशद्वाराची साफसफाई, संकेतफलक उभारणे, तसेच जुन्या आरसीसी मंडपाऐवजी लाकडी मंडप उभारला जाईल.
या कामांमुळे अष्टविनायक मंदिरांचे प्राचीन वैभव अधिक खुलून दिसणार असून भाविकांना सुलभ आणि सुरक्षित सुविधा मिळणार आहेत. पर्यटनाच्या दृष्टीनेही या कामांमुळे पुणे, रायगड आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील धार्मिक स्थळांना नवा दर्जा प्राप्त होईल.