पुणे : दौंड–पाटस रस्त्यावरील जगदंब हॉटेलमध्ये आज दुपारच्या सुमारास गॅसचा भीषण स्फोट झाल्याने मोठी दुर्घटना घडली. या स्फोटात हॉटेलमधील 10 कामगार गंभीर भाजले असून सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील सहा कामगारांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
advertisement
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जगदंब हॉटेलमध्ये दुपारच्या वेळी नेहमीप्रमाणे स्वयंपाकाचे काम सुरू होते. याच दरम्यान स्वयंपाकघरात असलेल्या गॅस सिलिंडरमधून अचानक गॅस गळती होऊन जोरदार स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की त्याचा आवाज परिसरात दूरपर्यंत ऐकू आला. स्फोटाच्या झटक्याने स्वयंपाकघरातील साहित्य हवेत उडाले आणि आगीच्या ज्वाळांमध्ये कामगार होरपळले. काही कामगारांना बाहेर पळण्याची संधी मिळाली, तर काही जण तिथेच अडकले.
जखमींना ससून रुग्णालयात हलवले
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आणि जखमी कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दौंड येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथम उपचार केल्यानंतर गंभीर जखमींना ससून रुग्णालयात हलवण्यात आले.
सीसीटीव्ही फुटेज समोर
दरम्यान, ज्या जगदंब हॉटेलमध्ये हा स्फोट झाला, त्या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. या सीसीटीव्हीमध्ये कामगार काम करत असतानाच अचानक मोठा स्फोट झाल्याचे स्पष्टपणे दिसत असून काही क्षणांतच संपूर्ण स्वयंपाकघर आगीच्या भक्ष्यस्थानी गेलेले दिसते. या फुटेजमुळे स्फोटाची तीव्रता अधोरेखित झाली आहे.
या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने घटनास्थळाचा पंचनामा करून स्फोटाच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू केला आहे. गॅस सिलिंडरची गळती, सुरक्षा नियमांचे उल्लंघन किंवा अन्य तांत्रिक बिघाड याबाबत चौकशी केली जात आहे. दरम्यान, जखमी कामगारांच्या प्रकृतीकडे प्रशासनाचे लक्ष असून त्यांच्या उपचारासाठी आवश्यक ती मदत दिली जात असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
