पुणे : प्राणी आणि माणसातलं प्रेम काही नवं नाही. अगदी 24 तास जरी एखादा प्राणी आपल्यासोबत राहिला तरी आपल्याला त्याचा लळा लागतो. अशात जर अनेक दिवस एखादा प्राणी सोबत असेल तर तो अगदी आपल्या कुटुंबातला एक सदस्य होऊन जातो. मग अनेकजण आपल्या पाळीव कुत्र्याचा वाढदिवस साजरा करतात. आता तर पाळीव मांजरीचं, गायीचं डोहाळे जेवणदेखील दणक्यात साजरं केलं जातं. शिवाय आपल्या प्राण्याच्या मृत्यूनंतर त्याचे अंत्यसंस्कारही विधीवत पार पाडले जातात.
advertisement
पुण्याच्या हिंजवडीजवळील दारुंब्रे येथे राहणारे संदीप सोरटे यांनी चक्क आपल्या लाडक्या म्हशीचं पेंटिंग काढून घेतलंय. या पेंटिंगमध्ये त्यांची म्हैस अगदी जशीच्या तशी हुबेहूब दिसतेय. त्यामुळे संदीप यांनी या पेंटिंगसाठी तब्बल 45 हजार रुपये खर्च केले, परंतु दुर्दैव असं की, हे पेंटिंग पाहायला त्यांची म्हैसच या जगात नाहीये.
हेही वाचा : पुणेकरांनी साजरा केला लाडक्या 'क्वीन'चा Birthday, 95 वर्षांची झाली दख्खनची राणी'
संदीप हे गेली अनेक वर्षे दुग्धव्यवसाय करतात. त्यांचा हा व्यवसाय अगदी सुरळीत सुरू आहे. मागील 29 वर्ष त्यांनी एका म्हशीला आपल्या लेकीसारखं सांभाळलं. याच म्हशीचं निधन झाल्यानंतर तिच्या अंत्यविधीदरम्यान त्यांनी तिची आठवण म्हणून तिचं चित्र काढून घेतलं. त्यासाठी त्यांनी 45 हजार रुपये खर्च केले.
या म्हशीचं नाव होतं चांदी. तिच्यामुळे खरोखर संदीप यांच्या व्यवसायाची चांदी झाली. तिचं पेंटिंग तयार करण्यासाठी 3 महिन्यांहून अधिक कालावधी लागला. चांदीपासूनच संदीप यांनी दुग्धव्यवसाय सुरू केला होता. आता तिच्या पश्चात त्यांच्याकडे 20 म्हशी आणि 1 गाय आहे. परंतु चांदीची आठवण कायम राहावी यासाठी त्यांनी तिचं पेंटिंग तयार करून घेतलं. दरम्यान, चांदीपासून सुरू झालेल्या दुग्धव्यवसायात अनेक अडचणी आल्या परंतु सर्व अडचणींवर मात करत संदीप हे आज एक यशस्वी व्यावसायिक झाले आहेत.