अतिवेगावर नियंत्रणासाठी स्पीड कॅमेऱ्यांचा वापर
रोड सेफ्टी आणि ग्लोबल सेफ्टी पार्टनरशिप यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या पायलट प्रकल्पाची अंमलबजावणी लोणावळा आणि वडगाव मावळ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात आली आहे. जुन्या मुंबई–पुणे महामार्गासह काही महत्त्वाच्या ठिकाणी टू-कॅम लेझर स्पीड कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
अत्याधुनिक कॅमेरे ताशी तब्बल 320 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या वाहनांचा अचूक वेग मोजण्यास सक्षम आहेत. तसेच हे कॅमेरे दिवस आणि रात्री दोन्ही वेळेस प्रभावीपणे कार्य करतात. या कॅमेऱ्यांच्या मदतीने केवळ अतिवेगाने धावणाऱ्या वाहनांवरच नव्हे, तर सीट बेल्ट न लावणे, हेल्मेट न घालणे, वाहन चालवताना मोबाइलचा वापर करणे अशा विविध वाहतूक नियमभंगांवरही लक्ष ठेवले जाणार आहे.
advertisement
मुंबई-पुणे प्रवासासाठी मोठी खुशखबर; एक्सप्रेस वे आणि जुना हायवे सोडून आता मिळणार तिसरा पर्याय
अपघात कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी सांगितले की, पुणे ग्रामीण भागातील प्राणघातक रस्ते अपघातांमध्ये दुचाकीस्वार आणि पादचारी यांचे प्रमाण जास्त आहे. अतिवेग हे रस्ते अपघातांचे प्रमुख कारण असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे कडक अंमलबजावणी आणि जनजागृतीच्या माध्यमातून अपघातांमुळे होणारे मृत्यू आणि जखमींची संख्या कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उपलब्ध आकडेवारीनुसार, 2023 मध्ये पुणे ग्रामीण भागात रस्ते अपघातांमध्ये 983 जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे पाच टक्क्यांनी अधिक आहे. त्यामुळे रस्ता सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याची गरज निर्माण झाली होती. दरम्यान, मे 2025 मध्ये 40 पोलीस अधिकाऱ्यांना लेझर स्पीड कॅमेऱ्यांच्या वापराबाबत विशेष प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये कॅमेऱ्यांची मांडणी, प्रत्यक्ष अंमलबजावणी, तसेच पुरावे संकलन आणि त्यांचे व्यवस्थापन यावर विशेष भर देण्यात आला.






