शिरूर तालुक्यातील तरुणांमध्ये वाढत्या नशेच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी पाळत ठेवली होती. शनिवारी (१७ जानेवारी) मध्यरात्री शिरूरमधील बाबूरावनगर भागात एक व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून शादाब रियाज शेख (वय ४१) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील बॅगेची झडती घेतली असता, पोलिसांना चक्क १ किलो ५२ ग्रॅम एमडी ड्रग्ज सापडले.
advertisement
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी किंमत: जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत २ कोटी १० लाख ४० हजार रुपये इतकी प्रचंड आहे. ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोपी शादाब शेख याच्यावर एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
शिरूर पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक आता या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहे. हे ड्रग्ज कोठून आणले गेले आणि पुण्यात ते कोणाला विकले जाणार होते, याचा सखोल तपास सुरू आहे. या कारवाईमुळे अमली पदार्थांच्या तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
