पुणे : तृतीयपंथी हा समाजातील अविभाज्य घटक आहे. परंतु, त्यांच्याकडे नेहमीच एका वेगळ्या नजरेतून पाहिलं जातं. पुण्यातील पिंपरी चिंचवड भागात पहिला तृतीयपंथी समाजाचा सामुदायिक विवाह सोहळा पार पडलाय. शहरातील काळेवाडी परिसरात असलेल्या बालाजी मंगल कार्यालयामध्ये या विवाहाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी 5 तृतीयपंथी जोडपे विवाह बंधनात अडकली. याबाबतच लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी परिसरात असलेल्या बालाजी मंगल कार्यालयामध्ये खास विवाहाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी 5 तृतीयपंथी जोडपी विवाह बंधनात अडकली. नेहमीच समजापासून दुर्लक्षित राहिलेल्या या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा विवाह सोहळा संपन्न झाला. तृतीय पंथीयांना विवाहयोग्य जोडीदारासोबत आपला सुखी संसार थाटण्याचा हक्क आहे. तृतीय पंथीयांच्या विवाहास कायदेशीर मान्यता असल्याने सर्व बाबींची पूर्तता करून हा विवाह सोहळा पार पडला आहे.
माणसातला देव! 700 जणांना 30 रुपयांत भरपेट जेवण, पुणेकर स्वामी भक्ताची अशीही सेवा!
कसा झाला विवाह सोहळा?
या खास विवाह सोहळ्यात हळदी, वरात, वऱ्हाडी मंडळी, संसारोपयोगी साहित्य, कन्यादान, सप्तपदी सर्व काही पाहायला मिळालं. शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर या विवाह सोहळ्यास हजेरी लावली होती. पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या सोहळ्याचं सर्व स्तरातून कौतुक केलं जातंय. “लग्न करून एका बाईसारखा संसार करावा अशी इच्छा होती. यासाठी दोघांच्या घरच्यांची परवानगी आहे. हा एक आनंदाचा क्षण असून मी प्रेमाच्या धाग्यात बांधले गेले आहे,” अशा भावना नव वधूने व्यक्त केल्या.
महाराष्ट्रातील पहिलाच असा सोहळा
दरम्यान, समाजाने त्यांना स्वीकारलं पाहिजे. समाज मान्यता म्हणून त्यांच्याकडे बघितलं पाहिजे. यासाठी काही करता येईल म्हणून एक छोटा प्रयत्न केला आहे. पहिल्यांदा एकच विवाह करण्याचं ठरवण्यात आलं होतं. परंतु यामध्ये अनेक लोक जोडले गेले. त्यामुळे याला सामुदायिक विवाहाचं स्वरूप प्राप्त झालं. लोकांनी मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभाग घेतला. हा महाराष्ट्रातील पहिला सोहळा आहे जिथं तृतीयपंथींचा सामुदायिक विवाह झाला, अशी माहिती नाना कांबळे यांनी दिली आहे.