सातारा पोलिसांनी त्याचा शोध घेत असताना, शुक्रवारी पहाटे पोलिसांच्या पथकाने त्याला पकडण्यासाठी कारवाई केली. या वेळी भोसलेने पोलिसांवरच हल्ला चढवला. चार पोलिसांवर त्याने चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताच पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केला आणि यामध्ये भोसले ठार झाला. लखन भोसले हा गुन्हेगार प्रवृत्तीचा असून त्याच्यावर यापूर्वीही चोरी व दरोड्याचे गुन्हे दाखल होते. महिलेवर केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांवर दबाव वाढला होता की आरोपीला तातडीने गजाआड करावे. मात्र अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच भोसलेने हल्ला केला आणि अखेर त्याचा शेवट एन्काऊंटरमध्ये झाला.
advertisement
खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी तातडीने सापळा रचला. दोन दिवसापूर्वी महिलेच्या गळ्यातील चेन चोरी करून लखन भोसले फरार झाला होता. फरार झालेल्या लखन भोसले या आरोपीला शोधण्यासाठी सातारा पोलिसांचे पथक शिक्रापूर येथे गेले होते. लखन भोसलेला अटक करण्यासाठी गेलेल्या चार पोलिसांवर त्याने हल्ला केला. या हल्ल्यात चार पोलीस गंभीर जखमी झाले. आरोपी लखन भोसले हा खटाव तालुक्यातील जयराम स्वामी वडगाव येथील आहे.
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईचे स्वागत केले आहे. “महिलांच्या सुरक्षेसाठी धोकादायक गुन्हेगार रस्त्यावर मोकाट फिरत होते. पोलिसांनी योग्य वेळी कठोर कारवाई केली,” अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली. महिलेवर झालेल्या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र आरोपीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी जलद गतीने कारवाई करत आरोपीला गाठले. पोलिसांच्या या कारवाईनंतर परिसरात भीतीचे सावट कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळाल्याचे दिसून येत आहे.
लखन भोसले याच्यावर सातारा, सांगली, पुणे आणि इतर काही जिल्ह्यांत घरफोडी, दरोडे, चोरी, मारहाण अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. गुन्हेगारी जगतात त्याची दहशत होती. सातारा पोलिसांनी केलेली ही कारवाई केल्याचे पोलिस विभागाकडून सांगण्यात येत आहे.