वडगाव हे तालुक्याचे प्रमुख केंद्र असल्याने येथे जिल्हा आणि सत्र न्यायालय, महसूल, आरोग्य, कृषी यांसारखी महत्वाची शासकीय कार्यालये आहेत. याशिवाय पुणे, पिंपरी-चिंचवड आणि इतर गावांमधून दररोज हजारो नागरिक येथे कामानिमित्त ये-जा करतात. त्यामुळे शहरातील गर्दी दिवसेंदिवस वाढते आहे. गुरुवारच्या आठवडी बाजारात शेतकरी, भाजीपाला विक्रेते तसेच फळ विक्रेते मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गाड्या उभ्या करून थेट दुकानं लावतात. परिणामी रस्त्यावरील जागा व्यापली जाते आणि वाहनांची वाहतूक ठप्प होते.
advertisement
नागरिकांचा ठाम आग्रह आहे की, मुख्य रस्त्याच्या केवळ एका बाजूवरच दुकाने लावण्याची सक्ती केली तर परिस्थिती नियंत्रणात येईल. यामुळे खरेदीस आलेल्या लोकांना सोय होईल, तसेच वाहतुकीलाही अडथळा निर्माण होणार नाही. आपत्कालीन सेवा वाहनांना मोकळा मार्ग मिळेल.
याशिवाय, बाजाराच्या दिवशी वाहतूक पोलिसांची विशेष नेमणूक करावी, जेणेकरून गाड्यांची रांग आटोक्यात राहील. अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर तातडीने दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. नियम मोडणाऱ्यांना कठोर शिक्षा दिल्यास परिस्थिती सुधारेल, असा विश्वास नागरिक व्यक्त करतात.
गर्दीमुळे अनेक ग्राहक खरेदीस टाळाटाळ करतात. परिणामी व्यापाऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो. व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, योग्य नियोजन केल्यास खरेदीदार अधिक संख्येने बाजारात येतील आणि व्यापारालाही चालना मिळेल. त्यामुळे वाहतूक नियोजन, दुकाने मांडणी आणि पार्किंग नियंत्रण या सर्व गोष्टींची काटेकोर अंमलबजावणी करणे तातडीने आवश्यक झाले आहे.