नेमकी घटना काय?
पीडित महिलेचा विवाह २४ नोव्हेंबर २०२४ रोजी झाला होता. मात्र, संसार सुरळित सुरू होण्याआधीच सासरच्या मंडळींनी तिचे जगणे असह्य केले. पती राजदीप, सासरे प्रदीप आणि सासू हेमलता यांनी क्षुल्लक कारणांवरून तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे, तिला घरात उपाशी ठेवण्याचेही क्रूर प्रकार घडले.
advertisement
शेअर मार्केटमधील तोट्यासाठी ५ लाखांची मागणी
सासरच्या मंडळींना शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर तोटा झाला होता. हा तोटा भरून काढण्यासाठी त्यांनी पीडितेच्या वडिलांकडे ५ लाख रुपयांची मागणी केली. छळाला कंटाळून पीडितेने वडिलांकडून ३ लाख रुपये आणून दिले, तरीही सासरच्यांची पैशांची हाव संपली नाही. दिवाळीत पुन्हा पैशांची मागणी करत तिला माहेरी पाठवून देण्यात आले.
"पैसे नसतील तर घरात पाऊल ठेवू नको"
२१ डिसेंबर २०२५ रोजी जेव्हा पीडिता पुन्हा सासरी आली, तेव्हा तिला घरात घेण्यास नकार देण्यात आला. "पैसे आणले असतील तरच घरात ये," अशी धमकी देत सासरच्यांनी तिला प्रवेश नाकारला. यावेळी झालेल्या वादात सासऱ्याने तिला बेल्टने अमानुषपणे मारहाण केली, तर पतीने लाथाबुक्क्यांनी मारले. सासूनेही या मारहाणीत साथ दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या जीवघेण्या हल्ल्यात पीडितेच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात सासरच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, अशा क्रूर प्रवृत्तींविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
