नायलॉन मांजा अत्यंत धारदार आणि सहजासहजी न तुटणारा असल्याने त्यामुळे गंभीर अपघात किंवा मृत्यू घडल्यास थेट 'सदोष मनुष्यवधाचा' गुन्हा दाखल केला जाणार आहे. जर एखादा मुलगा अशा जीवघेण्या मांजाचा वापर करताना आढळला, तर त्याच्या या कृतीसाठी त्याच्या पालकांना कायदेशीररीत्या जबाबदार धरले जाईल. यामुळे त्यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार असेल. राज्य शासनाने या मांजाच्या निर्मिती, विक्री आणि वापरावर पूर्णतः बंदी घातली असली तरी शहराच्या अनेक भागांत, इमारतींच्या गच्चीवर आणि मैदानांमध्ये चोरट्या मार्गाने याचा वापर सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.
advertisement
पुण्यात खड्ड्यामुळं अपघात? आता गप्प राहायचं नाही, इथं अर्ज करायचा, मिळेल भरपाई
या जीवघेण्या मांजामुळे शहरात यापूर्वी अनेक निष्पाप नागरिकांचा गळा कापला जाऊन मृत्यू झाला आहे. तर हजारो पक्षी कायमचे जायबंदी झाले आहेत. ही परिस्थिती टाळण्यासाठी पोलिसांनी आता कंबर कसली असून, साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांवर करडी नजर ठेवली जात आहे. कोणत्याही व्यक्तीने चायनीज किंवा नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक अथवा वापर केल्यास त्याला तुरुंगवासाची आणि मोठ्या दंडाची शिक्षा भोगावी लागू शकते.
नागरिकांनी देखील या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या परिसरात अशा प्रतिबंधित मांजाची विक्री किंवा वापर होत असल्याची माहिती मिळाल्यास तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाच्या '११२' या क्रमांकावर किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. केवळ एका मनोरंजनासाठी कोणाचा जीव धोक्यात येऊ नये. यासाठी पालकांनी आपल्या मुलांना अशा धोकादायक मांजापासून दूर ठेवावे आणि सण सुरक्षितपणे साजरा करावा, असेही कळकळीचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
