आग्या मोहोळ मधमाशांचा अचानक हल्ला
पुण्यातील एका खासगी साहसी ट्रेकिंग क्लासच्या माध्यमातून सुमारे 50 हून अधिक विद्यार्थी आणि त्यांचे मार्गदर्शक या ट्रेकसाठी आले होते. यामध्ये प्रामुख्याने 14 ते 17 वयोगटातील मुलांचा समावेश होता. मढे घाट उतरल्यानंतर मध्यभागी असलेल्या गर्द झाडीतून जात असताना झाडावर असलेल्या आग्या मोहोळाच्या माशा उठल्या आणि त्यांनी थेट विद्यार्थ्यांवर हल्ला केला. मधमाशांच्या डंखापासून वाचण्यासाठी विद्यार्थी सैरभर झाले, मात्र या धावपळीत 35 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
advertisement
कड्यामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना वाचवलं
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात 8 ते 10 विद्यार्थी मोठ्या प्रमाणात जखमी झाले असून, इतर 25 जणांना मधमाशांनी शरीरावर ठिकठिकाणी चावा घेतला आहे. घटनेची माहिती मिळताच तोरण माची हॉटेलचे मालक अभिजीत भेके यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केलं. यानंतर केळद गावचे माजी सरपंच रमेश शिंदे आणि इतर स्थानिकांनी कड्यामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
2 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर
जखमी विद्यार्थ्यांना तातडीने 108 रुग्णवाहिका आणि खासगी वाहनांमधून वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दंश झालेल्या ठिकाणी तीव्र वेदना होणे, चक्कर येणे, उलटी आणि चेहऱ्यावर प्रचंड सूज येणे अशी लक्षणे या विद्यार्थ्यांमध्ये दिसत होती. ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. ज्ञानेश्वर हिरास आणि त्यांच्या टीमने तातडीने उपचार सुरू केले. अधिक गंभीर असलेल्या 2 विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले असून, उर्वरित सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अंबादास देवकर यांनी दिली आहे.
