पुणे सोलापूर महामार्ग पाण्याखाली
रात्री झालेल्या जोरदार पावसाने ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर आणि वाकवस्ती परिसरात तर परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. सर्व्हिस रोड पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे अनेक वाहने पाण्यात अडकली आहेत, तर काही घरांमध्ये आणि दुकानांमध्येही पाणी शिरले आहे. या भागातील नागरिक मोठ्या अडचणींचा सामना करत आहेत.
advertisement
पुण्यात शाळांना सुट्टी
घाटमाथ्यावरही जोरदार पाऊस झाल्यामुळे खडकवासला धरण साखळीतील पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे प्रशासनाने खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात सुरू असलेला विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मुसळधार पावसामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पुणे उपनगरांतील काही शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.नागरिकांनी सतर्क राहावे आणि आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे, असे आवाहन पुणे प्रशासनाने केलं आहे.
मुंबईत काय स्थिती?
मुंबईतही रात्रभर पावसाने झोडपून काढल्यानंतर आताही वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. दादार, बांद्रा, अंधेरी सबवे, माटुंगा इथे पाणी साचायला सुरुवात झाली. मध्य आणि हार्बर रेल्वे 20 मिनिटं उशिराने धावत आहेत. तर मोनो रेल्वे तांत्रिक कारणामुळे बंद पडली आहे. मुलुंड टोलनाका परिसरात पावसामुळे वाहतूक कोंडी झाली आहे.इस्टर्न एक्सप्रेसवेवर वाहतूक संथ गतीनं सुरू आहे. मुंबईत अजूनतरी शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली नाही.
पुढचे तीन दिवस पाऊस
राज्याला आज मुसळधार ते अतिवृष्टीसदृश पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात २०० तर मध्य महाराष्ट्रात १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढचे तीन दिवस अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन करण्यात आलं आहे.
मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू
नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास अखेर राजस्थानमधून सुरू झाल्याचे भारतीय हवामान विभागाने रविवारी जाहीर केले. पश्चिम राजस्थानच्या काही भागातून मोसमी वाऱ्यांनी माघार घेतली आहे. महाराष्ट्रातून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस माघारी फिरेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 15 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातून मान्सून जाईल असा प्राथमिक अंदाज आहे.