पुण्यातील अपघातप्रवण 19 रस्त्यांच्या यादीत नवले पूल हा सर्वाधिक धोकादायक रस्ता ठरला आहे. या मार्गावर सातत्याने अपघात होत असल्याने वाहनचालकांसह नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे वाहतूक पोलिसांनी कात्रज नवीन बोगदा ते नवले ब्रिज दरम्यान 40 किमी प्रतितास वेगमर्यादा लागू केली आहे. याआधी येथे 30 किमी प्रतितास वेगमर्यादा होती. वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्ही, स्पीड गन आणि नव्याने बसविण्यात येणाऱ्या स्पीड कॅमेऱ्यांमार्फत कारवाई केली जाणार आहे.
advertisement
सेवा रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन
पुणे–सातारा महामार्गावरील कात्रज नवीन बोगदा ते नवले ब्रिज या टप्प्यावर स्पीड नियंत्रणासाठी कॅमेरे व गॅन्ट्री बसवण्याच्या कामासाठी 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत साताराकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात नागरिकांनी कात्रज जुना बोगदा आणि सेवा रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कार्यालयाचे प्रकल्प संचालक यांनी केले आहे.
दरम्यान, 13 नोव्हेंबर 2025 रोजी नवले पुलावर झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर 13 हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते. त्यानंतरही नवले पुलावर अपघातांची मालिका सुरूच होती. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून गॅन्ट्री व स्पीड कॅमेरे बसवण्याचे काम हाती घेतले आहे.






