पुणे : आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात मोठा वाद उभा ठाकलाय. चावडी चौकातील दर्ग्याचे बांधकाम सुरू असताना भिंत कोसळली आणि त्यातून भुयारासह हिंदू स्थापत्य सदृश बांधकाम दिसल्याने वातावरण तापलं. या घटनेची बातमी पसरल्यानंतर हिंदू आणि मुस्लिम संघटना आमने-सामने येऊन तणाव निर्माण झाला होता. मात्र प्रशासनाने वेळीच मध्यस्थी करत तणाव शांत केला आहे, असं असलं तरी प्रशासनासमोर आता सामाजिक सलोखा राखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
advertisement
मंचरच्या चावडी चौकात दर्ग्याच्या भिंतीचे काम सुरू असताना अचानक भिंत कोसळली. आतमध्ये भुयार आणि हिंदू स्थापत्य शैली असणारी कमान दिसून आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. यानंतर हिंदू संघटनांनी दर्ग्याखाली मंदिर असल्याचा दावा केला, तर मुस्लिम संघटनांनी तीव्र विरोध नोंदवत इथे फक्त दर्गा आणि कबर असल्याचं सांगितलं. काल दुपारी दोन ते अडीच वाजता ही घटना घडली. कामगार भिंतीखाली काम करत असताना भिंत कोसळली. सुदैवाने कामगार बचावला, पण दर्ग्याचा मोठा दर्शनी भाग पडला.
दुरुस्तीकरता तब्बल 60 लाखांचा निधी मंजूर
नगरपंचायतीने या दुरुस्तीकरता तब्बल 60 लाखांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती समोर आली आहे. पण या कामाला अधिकृत परवानगी होती का? हा प्रश्नही उपस्थित होत आहे. त्यातच दर्ग्याखाली भुयार सापडल्याने व त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. तर या भुयाराची पुरातत्व खात्यामार्फत चौकशी करावी व नक्की हे भुयार व त्यातील वास्तू काय आहे याचा अहवाल पुरातत्व खात्याने द्यावा तो आम्हाला मान्य राहील अशी मागणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केली आहे.
मंचर शहरात तणावाची परिस्थिती निर्माण
घटनेनंतर संपूर्ण मंचर शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. काल रात्रीपासून व आज दिवसभरही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रांताधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान, प्रशासनाने स्पष्ट केले आहे की न्यायालयीन आदेश येईपर्यंत इथे कुठलेही पुढील बांधकाम होऊ देण्यात येणार नाही.
निकालाकडे सगळ्यांच लक्ष
पोलीस प्रशासनाने हिंदू व मुस्लिम समाजातील प्रमुख नेत्यांची बैठक घेऊन सलोखा राखण्याचे आवाहन केले. मुस्लिम समाजाने निर्णय मान्य करण्याची तयारी दर्शवली, तर हिंदू संघटनांनी न्यायालयात जाऊन स्थगिती मागण्याची भूमिका घेतली आहे. एकूणच, मंचर दर्ग्याखाली मंदिर असल्याचा दावा पुढे येतोय, तर मुस्लिम संघटना हे फेटाळून लावतायत. या वादाचा निकाल काय लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण तोपर्यंत सामाजिक सलोखा राखणं हेच प्रशासनासमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे.