शिवम २०१३ च्या भीषण केदारनाथ पुरात वाहून गेला होता. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला, पण तो सापडला नाही. पुढे तो नेमका कसा आणि कधी महाराष्ट्रात पोहोचला, हे कुणालाच माहीत नाही. तो छत्रपती संभाजीनगरमधील एका मंदिरात सेवा देऊ लागला. शिवमची मानसिक स्थिती स्थिर नसल्याने तो स्वतःची ओळख सांगू शकला नाही. यादरम्यान, २७ ऑक्टोबर २०२१ रोजी एका धार्मिक वादाच्या प्रकरणात वैजापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्याची ढासळलेली मानसिक प्रकृती पाहून त्याला उपचारासाठी पुण्याच्या येरवडा मानसिक रुग्णालयात पाठवण्यात आलं.
advertisement
रोहिणी भोसले यांनी उलगडले गुपित
रुग्णालयातील समाजसेवा अधीक्षक रोहिणी भोसले यांनी शिवमशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला भाषेची अडचण आली, कारण शिवम डोंगरी हिंदी बोलत होता. रोहिणी यांनी त्याच्याशी हळुवारपणे बोलून त्याच्या शिक्षणाबद्दल विचारले असता, त्याने हरिद्वारजवळील 'प्रेम विद्यालय, रूडकी' येथे शिकत असल्याचे सांगितले. या माहितीवरून रोहिणी यांनी गुगलची मदत घेतली आणि उत्तराखंडमधील संबंधित पोलीस स्टेशनचा शोध घेतला.
गुगल आणि तंत्रज्ञानामुळे पुनर्भेट
रुग्णालय प्रशासनाने उत्तराखंड पोलिसांशी संपर्क साधून शिवमचा फोटो पाठवला. दोन दिवसांतच शिवमच्या भावाचा शोध लागला. जेव्हा व्हिडिओ कॉलद्वारे भावाने शिवमला पाहिले, तेव्हा दोघेही भावूक झाले. २०१३ च्या प्रलयात शिवमचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांनी मानले होते, त्यामुळे हा त्यांच्यासाठी एक चमत्कारच होता.
न्यायालयीन प्रक्रियेतून निर्दोष मुक्तता
दरम्यान, शिवमवर छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यातही तो निर्दोष असल्याचे सिद्ध झाले. वैजापूरचे सहायक पोलीस निरीक्षक वैभव रणखांब यांनी नवीन दोषारोपपत्र तयार करून न्यायालयात सादर केले, ज्यानंतर न्यायालयाने शिवमला या प्रकरणातून मुक्त केले.
शुक्रवारी शिवमचे नातेवाईक पुण्यात आले आणि येरवडा रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानून शिवमला आपल्यासोबत केदारनाथला घेऊन गेले. रोहिणी भोसले आणि रुग्णालय प्रशासनाच्या सातत्यामुळे एका तरुणाचा १० वर्षांचा वनवास संपला आहे.
