उपनगरीय रेल्वे आणि मासिक सीझन तिकिटांचे दर जैसे थे
रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, उपनगरीय रेल्वे तसेच मासिक सीझन तिकिटांच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे मुंबई, पुणे, चेन्नई, कोलकाता यांसारख्या शहरांतील रोज रेल्वेने ये-जा करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. याशिवाय 215 किलोमीटरपर्यंतच्या सामान्य वर्गाच्या प्रवासासाठीही तिकीट दर पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आले आहेत. मात्र 215 किलोमीटरहून अधिक अंतरासाठी सामान्य वर्गाच्या तिकिटांचे दर थोडे वाढवण्यात आले आहेत.
advertisement
या प्रवासासाठी आता प्रतिकिलोमीटर 1 पैसा अधिक आकारला जाणार आहे. तसेच मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांमधून नॉन-एसी प्रवास करणाऱ्यांसाठी प्रतिकिलोमीटर 2 पैशांची, तर एसी प्रवासासाठीही तेवढीच वाढ लागू होणार आहे. त्यामुळे नॉन-एसी डब्यातून साधारण 500 किलोमीटरचा प्रवास केल्यास प्रवाशाला सुमारे 10 रुपये जास्त खर्च येणार आहे.
600 कोटींचे वाढीव उत्पन्न अपेक्षित
या नव्या दररचनेमुळे चालू आर्थिक वर्षात रेल्वेला सुमारे 600 कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांत रेल्वेने आपले जाळे मोठ्या प्रमाणावर वाढवले आहे. तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सेवा सुधारण्यासाठी मनुष्यबळ वाढवण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवरील खर्च सध्या सुमारे 1 लाख 15 हजार कोटी रुपये झाला आहे, तर पेन्शनवरील खर्च 60 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. एकूणच 2024-25 या आर्थिक वर्षात रेल्वेचा ऑपरेशनल खर्च सुमारे 2 लाख 63 हजार कोटी रुपयांपर्यंत गेला आहे.






