Pune Theft : पुणेकरांनो सावधान! घराला कुलूप लावून बाहेर जाताय? 'त्यांचं लक्ष आहे' शहरातून 3 धक्कादायक घटना समोर
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
चोरट्यांनी शिवणे, नवी पेठ आणि वाघोली अशा तीन वेगवेगळ्या ठिकाणी धाडसी घरफोड्या करत सुमारे ५३ लाख रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास केला आहे
पुणे : पुणे शहरात घरफोडीच्या घटनांनी पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी शिवणे, नवी पेठ आणि वाघोली अशा तीन वेगवेगळ्या ठिकाणी धाडसी घरफोड्या करत सुमारे ५३ लाख रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास केला आहे. शहरात एकाच वेळी विविध भागात झालेल्या या चोऱ्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
सर्वात मोठी चोरी एनडीए रस्त्यावरील शिवणे परिसरात असलेल्या लक्ष्मी शांतिबन सोसायटीत घडली. येथे चोरट्यांनी भरवस्तीत असलेल्या एका बंद फ्लॅटचे कुलूप अत्यंत शिताफीने तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटाचे लॉक तोडून चोरट्यांनी त्यातील तब्बल ३९ लाख ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. घरमालक परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आणि परिसरात एकच खळबळ उडाली. उत्तमनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक मोनिका जेजोट या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत.
advertisement
दुसरी घटना वाघोली येथील स्टार सिटी सोसायटीमध्ये घडली. येथे एका महिलेच्या बंद फ्लॅटला चोरट्यांनी लक्ष्य केले. घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील १२ लाख ३२ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. वाघोली परिसरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
advertisement
तसेच, शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या नवी पेठेतील नवले पथ परिसरातही चोरीची घटना समोर आली आहे. एका बैठ्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी १ लाख ६२ हजार रुपयांचे दागिने लंपास केले. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक कारके पुढील तपास करत आहेत.
पुणे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, घराबाहेर जाताना मौल्यवान दागिने घरात ठेवू नयेत आणि सोसायटीमधील सीसीटीव्ही कॅमेरे सुस्थितीत असल्याची खात्री करावी. या तिन्ही घटनांमधील साम्य पाहता, एखाद्या सराईत टोळीने शहरात पाळत ठेवून हे गुन्हे केले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 22, 2025 8:40 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Theft : पुणेकरांनो सावधान! घराला कुलूप लावून बाहेर जाताय? 'त्यांचं लक्ष आहे' शहरातून 3 धक्कादायक घटना समोर











