राजगडावर फिरायला गेले पर्यटक; महिलेच्या 'परफ्युम'मुळे अचानक घडलं भयंकर, 35 जण रुग्णालयात दाखल
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
एका महिला पर्यटकाने वापरलेल्या सुगंधी द्रव्याचा (परफ्युम) वास हवेत पसरला. या तीव्र वासामुळे मधमाशा चवताळल्या आणि त्यांनी समूहाने पर्यटकांवर हल्ला चढवला
पुणे : ऐतिहासिक किल्ले राजगडावर निसर्गाचे नियम धाब्यावर बसवणे पर्यटकांच्या अंगलट आले आहे. शनिवारी (२० डिसेंबर) सुवेळा माचीवर मधमाशांनी केलेल्या भीषण हल्ल्यात सुमारे २० ते २५ पर्यटक जखमी झाले. धक्कादायक म्हणजे, गेल्या तीन महिन्यांतील ही पाचवी घटना असून, आतापर्यंत २०० हून अधिक पर्यटक या मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, कराड आणि मुंबई येथून पर्यटकांचे गट गडावर आले होते. सुवेळा माची परिसरात फिरत असताना, एका महिला पर्यटकाने वापरलेल्या सुगंधी द्रव्याचा (परफ्युम) वास हवेत पसरला. या तीव्र वासामुळे मधमाशा चवताळल्या आणि त्यांनी समूहाने पर्यटकांवर हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे पर्यटकांची मोठी धावपळ उडाली आणि जीव वाचवण्यासाठी ते सैरावैरा पळू लागले.
advertisement
बेशुद्ध पर्यटकांना खांद्यावरून खाली आणले:
हल्ल्याची तीव्रता इतकी मोठी होती की, काही पर्यटक जागीच बेशुद्ध पडले. पुरातत्व विभागाचे किल्लेदार दादू वेगरे, बापू साबळे, दीपक पिलावरे आणि स्थानिक ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता जखमींना गडावरून खाली उतरवले. गंभीर जखमी असलेल्या सात ते आठ पर्यटकांना तातडीने वेल्हे आणि नसरापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये अविनाश चव्हाण (२५) आणि गणेश चव्हाण (२८) (रा. कराड) यांच्यावर वेल्हे येथे उपचार सुरू असल्याची माहिती डॉ. चंद्रकांत भोईटे यांनी दिली.
advertisement
गडावर चढताना सुगंधी द्रव्ये वापरू नयेत, आरडाओरडा करू नये, अशा स्पष्ट सूचना पुरातत्व विभागाने दिल्या आहेत. मात्र, अनेक अतिउत्साही पर्यटक या नियमांकडे दुर्लक्ष करतात. वारंवार घडणाऱ्या या घटनांनंतर आता गडाच्या पायथ्याशी पर्यटकांची तपासणी करूनच त्यांना वर सोडावे, अशी मागणी स्थानिक प्रशासनाकडून केली जात आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 22, 2025 10:13 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
राजगडावर फिरायला गेले पर्यटक; महिलेच्या 'परफ्युम'मुळे अचानक घडलं भयंकर, 35 जण रुग्णालयात दाखल











