राज्य मंडळाने दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी खासगी विद्यार्थ्यांची नावनोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच भरता येणार असून, यासाठी फॉर्म क्रमांक 17 चा वापर करावा लागेल. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर अशी निश्चित करण्यात आली आहे. या कालावधीत अर्ज भरताना विद्यार्थ्यांना प्रति दिवस 20 रुपये अतिविलंब शुल्क भरावे लागणार आहे.
advertisement
विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करणे बंधनकारक आहे. यात शाळा सोडल्याचा दाखला (मूळ किंवा द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र), आधारकार्ड, तसेच पासपोर्ट आकारातील फोटो यांचा समावेश आहे. सर्व माहिती अपलोड झाल्यानंतर पात्र विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र ऑनलाइन स्वरूपात देण्यात येणार आहे.
नावनोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी मंडळाने ठरविलेल्या कालावधीतच परीक्षेचे आवेदनपत्र व परीक्षा शुल्क भरावे लागेल. त्यानंतर छाननी पूर्ण झाल्यावर मूळ कागदपत्रे परत मिळवण्याची जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यांची राहील. मंडळाने स्पष्ट केले आहे की, या प्रक्रियेत कुठलाही अर्ज ऑफलाइन स्वीकारला जाणार नाही. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावरील सूचना काळजीपूर्वक वाचूनच अर्ज भरावा.
या सुविधेमुळे शाळा सोडलेले किंवा नियमित शिक्षणातून बाहेर पडलेले विद्यार्थी पुन्हा एकदा आपले शिक्षण पूर्ण करून दहावी किंवा बारावीची परीक्षा देऊ शकतील. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांसाठी ही योजना पुनःशिक्षणाची संधी ठरणार आहे. अधिक माहितीसाठी संबंधित विद्यार्थी, शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि पालकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील विभागीय मंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे.






