समीर संभाजी ढमढेरे (वय २१) आणि सार्थक विजय ढमढेरे (वय २०, दोघे रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दुर्दैवी युवकांची नावे आहेत.
तळेगाव ढमढेरे, भीमाशेत येथील दीपक ढमढेरे, समीर ढमढेरे आणि सार्थक ढमढेरे हे तिघे मित्र एकाच दुचाकीवरून ११ डिसेंबर रोजी नारायणपूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन आटोपून तिघेही घरी परत येत होते. मात्र, शिंदवणे घाटातून जात असताना त्यांच्यासोबत ही दुर्घटना घडली.
advertisement
चिंताजनक! पिंपरी-चिंचवडची हवा 'विषारी'; शहराचा AQI 200 पार, नागरिकांसाठी धोक्याची घंटा
समोरून अतिवेगाने आलेल्या एका टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील तिघेही मित्र गंभीर जखमी झाले. यामध्ये समीर ढमढेरे आणि सार्थक ढमढेरे यांना डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली. तर दीपक ढमढेरे किरकोळ जखमी झाला.
अपघात घडताच टेम्पो चालक आपला टेम्पो घटनास्थळी सोडून तात्काळ पळून गेला. परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र, गंभीर दुखापतीमुळे उपचार सुरू असताना मंगळवारी (दि. १६) समीर आणि सार्थक यांचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे तळेगाव ढमढेरे आणि भीमाशेत परिसरात शोककळा पसरली आहे. देवदर्शनासाठी गेलेल्या दोन तरुण जीवांचा अपघातात अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी पळून गेलेल्या टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू आहे.
