पुणे: राज्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. महाराष्ट्रातील बहुतांश भागात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकण किनापरट्टीवर ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. 27 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
मुंबई आणि पुण्यासारख्या शहरी भागांत हवामान ढगाळ राहील, तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत 16 मे रोजी तापमान 29-34 अंश सेल्सियस दरम्यान राहील, तर पुण्यात 28-32 अंश सेल्सियसपर्यंत तापमानाची नोंद होईल. कोकणात पावसाचा जोर अधिक असेल, तर विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. नाशिक आणि औरंगाबादमध्येही पावसासह वादळी वाऱ्याचा अंदाज आहे.
आस्मानी संकट आलं अन् होत्याचं नव्हतं झालं! काही मिनिटांत शेतकऱ्याचं 12 लाखांचं नुकसान!
राज्यात गुरुवारी देखील वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. पुणे, सातारा, अहिल्यानगर, धाराशिव, बीड, लातूर या जिल्ह्यांना 15 मे रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. तर आज पुन्हा 27 जिल्ह्यांना वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून राज्यात पुढील काही काळ पावसाची हीच स्थिती कायम राहणार आहे.
हवामान खात्याने शेतकऱ्यांना आणि मच्छीमारांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोकण किनारपट्टीवर समुद्र खवळलेला राहील, त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, विजा पडण्याच्या शक्यतेमुळे उघड्यावर काम करणाऱ्या मजुरांनी आणि नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, वादळी पावसामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळेल, परंतु, शहरांत रस्त्यावर पाणी साचण्याची आणि वाहतूक कोंडीची शक्यता आहे. स्थानिक प्रशासनाने पावसाळी परिस्थिती हाताळण्यासाठी तयारी केली आहे. नागरिकांना हवामान अंदाजाकडे लक्ष ठेवण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





