Pimpri News : पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा! वाहतूक कोंडीतून सुटण्यासाठी होणार नवीन रस्ता; नेमका कुठे असेल हा मार्ग
Last Updated:
Pimpri News : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कासारवाडी ते दापोडी रेल्वे मार्गाजवळ 18 मीटर डीपी रस्ता तयार करण्यात येणार आहे. या रस्त्यामुळे या परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कासारवाडी पूल ते दापोडी पूल या रेल्वे मार्गाच्या एका बाजूने डीपी रस्ता तयार करण्याची योजना आखण्यात आली आहे. या रस्त्याच्या उभारणीमुळे कासारवाडी, फुगेवाडी आणि दापोडी या भागांना नव्या पर्यायी अंतर्गत रस्त्याचा लाभ मिळणार आहे.
सध्या या भागात विशेषतहा दापोडी ते निगडी या मार्गावर वाढत्या वाहतुकीमुळे ताण निर्माण होत आहे. मात्र, नव्या समांतर रस्त्याच्या विकासामुळे या मार्गावरील गर्दी कमी होईल आणि नागरिकांना प्रवासासाठी अधिक सुकर मार्ग मिळेल.
कसा असेल नवीन मार्ग
महापालिकेच्या विकास योजना आराखड्यानुसार नाशिक फाटा ते दापोडी पूल या दरम्यानच्या रेल्वे मार्गालगतचा हा 18 मीटर रुंद रस्ता आरक्षित ठेवण्यात आला होता. आता हा आराखडा प्रत्यक्षात उतरविण्याचे काम सुरू झाले आहे. या रस्त्याचे एकूण अंतर 2.5 किलोमीटर असून हा रस्ता लोकवस्तीतून जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना रेल्वे मार्गाच्या समांतर पर्यायी जोडरस्ता मिळणार आहे. या योजनेसाठी सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया पार पडली असून एकूण 8 सल्लागारांनी निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला होता. त्यापैकी चार सल्लागारांनी शहर अभियंता मकरंद निकम यांच्या दालनात सादरीकरण केले.
advertisement
तांत्रिक तपासणीनंतर तीन सल्लागार निवडले गेले. ज्यात स्वराज इंजिनिअरिंग कन्सल्टंसी या एजन्सीला सर्वाधिक गुण मिळाले. त्यामुळे या कामासाठी त्यांच्या निवडीला मंजुरी देण्यात आली आहे. या एजन्सीला निविदापूर्व 0.50 टक्के आणि निविदा पश्चात 1.18 टक्के, अशा मिळून एकूण 1.68 टक्के शुल्क दिले जाणार आहे. आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी या निर्णयास तसेच खर्चास स्थायी समितीची मान्यता दिली आहे.
advertisement
सध्या हिराबाई लांडगे चाळ, कासारवाडी पूल ते दापोडीच्या हॅरिस पुलापर्यंत काही ठिकाणी रस्ता तयार करण्यात आला असून काही भाग ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे. हा रस्ता फुगेवाडी स्मशानभूमी परिसरातून जातो. रस्त्याच्या अंतिम विकासासाठी सल्लागार एजन्सीच्या नियुक्तीनंतर निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल. कार्यकारी अभियंता सतीश वाघमारे यांनी सांगितले की, या रस्त्याच्या पूर्णत्वानंतर दापोडी ते निगडी मार्गावरील वाहतुकीचा मोठा भार कमी होईल. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि शहरातील अंतर्गत वाहतुकीत मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल. हा रस्ता पिंपरी-चिंचवडकरांसाठी वाहतूक कोंडीवरचा एक महत्त्वाचा उपाय ठरणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 25, 2025 1:32 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pimpri News : पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा! वाहतूक कोंडीतून सुटण्यासाठी होणार नवीन रस्ता; नेमका कुठे असेल हा मार्ग


