हिंजवडी आयटी पार्क, माण आणि शिवाजीनगर या प्रमुख भागांना जोडणारा हा मेट्रो प्रकल्प पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत यापूर्वी चार स्टेशनपर्यंत चार ते पाच वेळा चाचणी धाव (ट्रायल रन) यशस्वीरीत्या घेण्यात आल्या होत्या. नुकतीच पार पडलेली आरडीएसओची तपासणी पूर्ण झाल्याने आता हा प्रकल्प प्रत्यक्ष कार्यान्वयनाच्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.
advertisement
शतपावली करायला बाहेर पडला अन् परतलाच नाही, नाशिकमध्ये काका-पुतण्याकडून तरुणावर सपासप वार
आरडीएसओ ही संस्था देशभरातील मेट्रो, रेल्वे आणि अत्याधुनिक वाहतूक प्रकल्पांसाठी तांत्रिक मानके ठरवते. विविध शहरांतील मेट्रो प्रकल्प वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत विकसित होत असल्याने, त्यामध्ये वापरण्यात येणारे तंत्रज्ञान भारतीय हवामान, रुळांची रचना आणि वाहतुकीच्या परिस्थितीत सुरक्षित आणि परिणामकारक आहे की नाही, याची खात्री आरडीएसओकडून केली जाते. मेट्रो गाड्यांची संरचना, डब्यांची रुंदी, ट्रॅकचे मोजमाप, वीज पुरवठा व्यवस्था, वळणांवरील स्थिरता, आपत्कालीन ब्रेक प्रणाली तसेच उच्च वेगात गाडीची हालचाल नियंत्रित आहे की नाही, याची कठोर चाचणी केली जाते. आरडीएसओचे प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय कोणतीही मेट्रो सेवा प्रवाशांसाठी सुरू करता येत नाही.
पीएमआरडीएकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या मेट्रो गाड्यांच्या पुरवठ्यातही समाधानकारक प्रगती झाली आहे. आतापर्यंत 14 मेट्रो ट्रेनसेट्स प्राप्त झाले असून, मंजूर वेळापत्रकानुसार एकूण 22 गाड्या लवकरच ताफ्यात दाखल होणार आहेत. या गाड्यांच्या साहाय्याने टप्प्याटप्प्याने पुढील चाचण्या, ट्रायल रन आणि त्यानंतर नियमित प्रवासी सेवा सुरू केली जाणार आहे.
सध्या सुरू असलेल्या कामाच्या गतीनुसार, साधारणपणे मार्च 2026 पर्यंत या मेट्रो मार्गावरील काही स्टेशन पूर्ण करून प्रवाशांसाठी सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ही मेट्रो सेवा सुरू झाल्यास पुण्यातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार असून, हिंजवडी आयटी परिसरातील लाखो कर्मचारी आणि नागरिकांना दिलासा मिळणार आहे.






