महापालिका आयुक्त आणि प्रशासक नवलकिशोर राम यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, शहरात भूसंपादन आणि इतर अडचणींमुळे रस्त्यांचे रुंदीकरण करणे शक्य नाही. या कारणास्तव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येरवडा ते कात्रज भुषारी मार्गाची कल्पना मांडली होती.
पुणे महानगर प्रादेशिक विकास महामंडळला या संदर्भातील अहवाल तयार करण्याचे काम दिले होते. PMRDAच्या सल्लागारांकडून हा अहवाल सध्या अंतिम टप्प्यात आहे. अहवाल पूर्ण होण्याआधीच महापालिकेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
advertisement
शहरात पूर्व आणि पश्चिम भाग जोडणारे अनेक रस्ते आहेत, परंतु उत्तर आणि दक्षिण भाग जोडणारे मार्ग कमी आहेत. येरवडा ते कात्रज अंतर सुमारे 14.5 किलोमीटर आहे. सतत वाहतूक कोंडीमुळे हा प्रवास पाऊण ते एक तास लागतो. यामुळे या मार्गावर बोगद्याचा प्रस्ताव मांडला होता. या बोगद्यामुळे प्रवास केवळ 20 मिनिटांत होऊ शकेल, असा दावा केला गेला होता.
दरम्यान पुणे महानगर परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत या अहवालाच्या प्राथमिक चाचण्या झाल्या. अहवालानुसार, सुमारे 18 ते 20 किलोमीटर लांबीच्या सहा मार्गिका रस्त्यांसाठी दोन बोगद्यावर काम करण्यासाठी अंदाजे 7,500 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
केवळ 20 किलोमीटरसाठी 7,500 कोटी रुपये खर्च महापालिकेसाठी खूप मोठा आहे. या रस्त्याचा उपयोग शहरातील सर्व नागरिक करू शकतील यासाठी अनेक ठिकाणी प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग तयार करणे आवश्यक आहे. मात्र, आधीच कोंडी होणाऱ्या रस्त्यांवर अतिरिक्त मार्गिका करणे शक्य नाही.
शहरातील नागरिकांना या रस्त्याचा उपयोग होणार असला तरी खर्चाच्या तुलनेत फायदा कमी असल्यामुळे महापालिकेच्या दृष्टिकोनातून हा प्रकल्प परवडणारा नाही. त्यामुळे या बोगद्याची योजना तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहे.